अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजयाचा नारळ फोडत ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. हा सामना झाल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली साजेशी कामगिरी करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. हा सामना भारतीय संघाचा १००० वा वनडे सामना होता. त्यामुळे भारतीय चाहत्यांना अशी अपेक्षा होती की, विराट कोहली ऐतिहासिक सामन्यात शतक झळकावेल. परंतु तो असे करण्यास अपयशी ठरला आहे. तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. असे असले तरी त्याने मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. या विक्रमात त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय संघाचा पहिल्या वनडे सामन्यातील फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून ‘एक जिंकलो, दोन शिल्लक आहेत..’ असे लिहिले आहे. या फोटोवर प्रतिक्रीया देत एका युजरने लिहिले की, “आता आम्ही थकलोय ७१ व्या शतकाची वाट पाहून..” तर दुसऱ्या एक युजरने लिहिले की, “तुझ्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे चॅम्प..” विराट कोहलीने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन होल्डरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर फॅबियन ॲलेनने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला अवघ्या १७६ धावा करण्यात यश आले होते.
One down, two to go. 🇮🇳 pic.twitter.com/SuwLko0zov
— Virat Kohli (@imVkohli) February 6, 2022
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
केवळ ८ धावा करूनही कोहली बनला आणखी एका विक्रमाचा ‘किंग’
रोहितच्या नेतृत्वात २०२२ मध्ये फुटला टीम इंडियाच्या विजयाचा नारळ; वेस्ट इंडीजवर केली ६ गड्यांनी मात
…म्हणून लतादीदींसाठी भारताच्या प्रत्येक सामन्यात दोन तिकिटे राखीव असायची