इंग्लंडच्या फरहान अहमदनं वयाच्या 16व्या वर्षी एका कसोटी सामन्यात 10 बळी घेऊन खळबळ उडवली आहे. यासह त्यानं तब्बल 159 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. फरहान अहमद फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका सामन्यात 10 बळी घेणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज बनला आहे. त्यानं ‘नॉटिंगहॅमशायर’ संघासाठी ‘सरे’ विरुद्ध ही कामगिरी केली. अहमदनं पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले.
22 फेब्रुवारी 2008 रोजी जन्मलेल्या फरहान अहमदनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 10 विकेट घेऊन डब्लूजी ग्रेसचा रेकॉर्ड मोडला. ग्रेस यांनी जून 1865 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 13 बळी घेतले होते. त्यावेळी त्यांचं वय 16 वर्ष 340 दिवस होतं. ग्रेस यांनी ‘जेटलमन ऑफ द साऊथ’ संघासाठी खेळताना ‘प्लेअर्स ऑफ द साऊथ’ विरुद्ध ही कामगिरी केली होती. आता फरहान अहमदनं 16 वर्ष 191 दिवस वयात ही कामगिरी करून हा रेकॉर्ड मोडला आहे.
पहिल्या डावात 7 बळी घेऊन फरहाननं काऊंटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 5 बळी घेण्याच्या विक्रमही केला होता. फरहान अहमद हा इंग्लंडचा लेग स्पिनर रोहान अहमदचा भाऊ आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सरे संघानं कर्णधार रोरी बार्न्स आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर 525 धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉटिंगहमशायरची टीम पहिल्या डावात 405 धावांवर गारद झाली.
पहिल्या डावात मिळालेल्या 120 धावांच्या आघाडीनंतर सरेनं दुसऱ्या डावात 9 विकेट गमावून 177 धावांवर डाव घोषित केला आणि नॉटिंगहमशायरला 298 धावांचं लक्ष्य दिलं. नॉटिंगहमशायरनं दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करताना शेवटच्या दिवशी एकही विकेट न गमावता 121 धावा केल्या. अशाप्रकारे हा सामना ड्रॉ झाला.
हेही वाचा –
प्रशिक्षक गंभीरने निवडली त्याची आवडती ‘ऑल टाइम इंडिया इलेव्हन’, चक्क रोहितला वगळले
“मी धोनीला कधीच माफ करणार नाही”, योगराज सिंग यांचे पुन्हा धोनीवर गंभीर आरोप
कर्णधाराने कॅच सोडला, तरीही संपूर्ण संघ आनंदी झाला; लाइव्ह मॅचमध्ये घडली विचित्र घटना