भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल केलेल्या भाष्याबद्दल यू टर्न घेतला असून अनुष्काची माफीही मागितली आहे.
इंजिनियर यांनी एका मुलाखतीत भारतीय संघाचे निवडकर्ते विश्वचषकादरम्यान अनुष्काला चहा नेऊन देत होते असे म्हणत टीका केली होती.
इंजिनियर यांच्या या भाष्यानंतर अनुष्काने मौन सोडत सोशल मीडियावर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. यामध्ये तिने ‘जर तूम्हाला निवड समीतीवर टीका करायची असेल तर जरूर करा पण त्यामध्ये माझे नाव आणू नका.’ असे म्हणत तिची तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
त्यानंतर आता इंजिनियर यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना म्हटले आहे की ‘मी हे भाष्य उपहासात्मक पद्धतीने केले होते. पण त्याचा डोंगर करण्यात आला.’
‘बिचाऱ्या अनुष्काला मधे आणण्यात आले. ती एक चांगली मुलगी आहे. विराट कोहली चांगला कर्णधार आहे आणि आणि रवी शास्त्रीही चांगले प्रशिक्षक आहेत. हे प्रकरण विनाकारण मोठे करण्यात आले. इथे निवड समीतीची चर्चा व्हायला हवी होती, ज्यांनी भारताचे ब्लेझर घातले आहे.’
‘हो ही घटना घडली, पण मी अनुष्कावर टीका करत नव्हतो. ती एक चांगली स्त्री आहे आणि एक शानदार व्यक्ती आहे. ती आणि विराट कोहली आदर्श आहेत. मी तिचा अपमान करत नव्हतो.’
‘जर तिला वाईट वाटले असेल तर मी तिची माफी मागतो. माझी टीका केवळ निवडकर्त्यांच्या बाबतीत होती. जे मला वाटते की त्यांचे काम योग्य पद्धतीने करत नाहीत. माझे अनुष्का किंवा विराटच्या विरोधात मत नाही.’






