बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. अजिंक्य रहाणेच्या ‘कॅप्टन्स इनिंग’मुळे भारतीय संघाच्या वाट्याला हे यश आले आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी रहाणेसह भारतीय संघाच्या जबरदस्त प्रदर्शनाची प्रशंसा होत आहे. यात माजी भारतीय क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी उडी घेतली आहे. बॉक्सिंग डे कसोटीतील विजयाची बरोबरी त्यांनी वनडे विश्वचषक विजयाशी केली आहे.
भारताने १९८३ आणि २०११ मध्ये जिंकले होते विश्वचषक
भारतीय संघाने १९८३ साली पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. माजी भारतीय अष्टपैलू कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने इतिहास रचला होता. त्यानंतर तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने दुसरा विश्वचषक पटकावला होता. २०११ साली भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने हा पराक्रम केला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना श्रीलंका संघाशी झाला होता.
फारुख इंजिनियर यांनी भारतीय संघाच्या बॉक्सिंग डे कसोटीतील विजयाची तुलना याच दोन विश्वचषक विजयाशी केली आहे.
फलंदाजांच्या चुकीमुळे पहिल्या कसोटीत संघाची दयनीय अवस्था
माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनियर स्पोर्ट्सकिडाशी बोलताना म्हणाले की, “ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी लाइन लेंथवर गोलंदाजी केली होती. त्यांच्या रणनितीनुसार भारतीय फलंदाज चुका करत गेले. परिणामत: शेवटी संघावर ३६ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. पण कसोटी मालिकेत पिछाडीवर पडल्यानंतर अशाप्रकारे पुनरागमन करणे खरोखरच शानदार होते. मेलबर्न कसोटीतील विजय २ विश्वचषक आणि १९७१ सालच्या द ओव्हल कसोटीतील विजयाप्रमाणे होता.”
अजिंक्य रहाणे एक लढवय्या आहे
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या ऐतिहासिक सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली होती. २२३ चेंडूंना सामना करत १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावांची तूफानी खेळी त्याने केली होती. त्याच्या या धुव्वादार फलंदाजीसाठी त्याला ‘जॉनी मुलाग मेडल’ने सन्मानित करण्यात आले होते.
रहाणेविषयी बोलताना फारुख इंजिनियर म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत आमच्या खेळाडूंनी शानदार पुनरागमन केले. कर्णधार रहाणे आणि पूर्ण संघाच्या कामगिरीला माझा सलाम. मी फार पुर्वीपासूनच रहाणेचा प्रशंसक राहिलो आहे. रहाणेने या सामन्यात पुढाकार घेत संघाचे नेतृत्त्व केले. मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता, असा विश्वास त्याने संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात भरला. मुंबईच्या शिवाजी पार्क भागातून आलेला रहाणे एक लढवय्या आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव
संकट टळले! इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह, लवकरच ‘या’ दौऱ्यासाठी भरणार उड्डाण