इंडियन प्रीमिअर लीगचा १५वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरू होत आहे. आता आयपीएल सुरू होण्यास फक्त ४ दिवसांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, १५० किमीपेक्षा अधिकच्या गतीने गोलंदाजी करणारा दिल्लीचा स्टार गोलंदाज एन्रीच नॉर्किया फिट झाला आहे आणि तो लवकरच संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, तो आयपीएलच्या सुरुवातीच्या २ सामन्यांना मुकण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे असले, तरीही त्यापुढे तो संघात परतणार असल्यामुळे कर्णधार रिषभ पंतही खुश असेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) आयपीएलच्या १५व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या सुरुवातीच्या २ सामन्यांना मुकणार आहे. मात्र, तो ७ एप्रिलपासून स्पर्धेत पुनरागमन करेल. ७ एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध तो खेळताना दिसेल. नॉर्किया मागील काही दिवसांपासून पार्श्वभागावर झालेल्या जखमेमुळे दुखापतग्रस्त होता. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नव्हता.
दिल्लीसाठी नॉर्किया फिट होण्याची बातमी ही खूप सकारात्मक आणि सुटकेचा नि:श्वास सोडणारी असेल. कारण, यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा लढवय्या गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, नॉर्कियाला दिल्ली कॅपिटल्स संघाने मेगा लिलावापूर्वी ६.५० कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अशात तो मुंबईला पोहोचला असून क्वारंटाईनमध्ये आहे. एन्रीच नॉर्कियाने मागच्या हंगामात ८ सामने खेळताना १२ विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे २०२०मध्ये या गोलंदाजाने १६ सामन्यात २२ विकेट्स आपल्या नावावर केले होते.
दिल्ली कॅपिटल्स संघ २७ मार्चपासून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. यानंतर २ एप्रिल रोजी त्यांचा सामना गुजरात टायटन्स संघाशी होईल.
आयपीएलदरम्यान दक्षिण आफ्रिका संघाला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका संघातील अनेक खेळाडूंनी कसोटी मालिकेला बगल देत आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नॉर्कियाचाही समावेश आहे. त्यामुळे नॉर्किया या हंगामात दिल्ली संघाची ताकद बनून विरोधी संघांवर बरसण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांचा नेट्समध्येही क्लास खेळ, पोलार्ड आणि ‘बेबी एबी’चा बुमराहच्या यॉर्करवर कसून सराव
VIDEO: लेकीसंगे डान्स, कॅमेरामॅनसोबत मस्ती; ‘हिटमॅन’ रोहितची कधीही न पाहिलेली बाजू
लखनऊ सुपर जायंट्सचा शोध संपला! मार्क वुडच्या जागी १४० किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूची वर्णी?