अवघ्या 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. हातात 6 विकेट्स होत्या. स्ट्राईकवर टीम डेविड आणि नॉन-स्ट्राईकवर तिलक वर्मा यांसारखे तगडे फलंदाजही होते. तरीही मुंबई इंडियन्स संघाच्या तोंडचा घास अर्शदीप सिंग याने पळवला. आयपीएल 2023 स्पर्धेचा 31वा सामना मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स संघात पार पडला. मुंबईच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच वानखेडेवरील या सामन्यात मुंबई संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचली असताना, पंजाबच्या सिंहाने म्हणजेच अर्शदीप सिंगने दोन वेळा स्टंप मोडला. तसेच, भेदक मारा करत पंजाबला 13 धावांनी विजयी केले. आता अखेरच्या षटकादरम्यानच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
तिसऱ्या चेंडूवर मोडला स्टंप
मुंबई इंडियन्स संघाच्या डावात पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) 20वे षटक टाकत होता. मुंबईला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होता. मात्र, अर्शदीपने पहिला चेंडू टीम डेविड याला टाकताच त्याने 1 धाव घेतली. त्यानंतर दुसरा चेंडू त्याने तिलक वर्मा याला निर्धाव टाकला. पुढे अर्शदीपने जे केले, कदाचित त्याचा विचारही त्याने केला नसेल. तर झाले असे की, अर्शदीपने तिसऱ्या चेंडू तिलकला इतक्या वेगाने टाकला की, चेंडूने मधला स्टंपच मोडून टाकला. हा क्षण कदाचित तिलक कधीच विसरणार नाही.
अर्शदीप एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पुढेही भेदक गोलंदाजी सुरूच ठेवली. तिलक 3 धावांवर बाद झाल्यानंतर नेहाल वढेरा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आला होता. पहिल्याच चेंडूचा सामना करणाऱ्या नेहालला अर्शदीपने पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकत स्टंपचे दोन तुकडे केले. त्यानंतर झोफ्रा आर्चर फलंदाजीला आला. आर्चरला पाचव्या चेंडूवर धाव घेता आली नाही. मात्र, त्याने शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. मात्र, ती विजयासाठी पुरेशी नव्हती. अशाप्रकारे अर्शदीपने कहर गोलंदाजी करत मुंबईचा पराभव केला. अर्शदीपच्या गोलंदाजीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Stump breaker,
Game changer!Remember to switch to Stump Cam when Arshdeep Akram bowls 😄#MIvPBKS #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @arshdeepsinghh pic.twitter.com/ZnpuNzeF7x
— JioCinema (@JioCinema) April 22, 2023
अर्शदीपची गोलंदाजी
अर्शदीपने या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली आणि अखेरच्या षटकात फक्त 2 धावा देऊन आपल्या संघाला 13 धावांनी विजय मिळवून दिला. त्याने यादरम्यान एकूण 4 षटकात 29 धावा खर्च करत 4 विकेट्स चटकावल्या. शेवटच्या षटकात त्याने लक्षवेधी गोलंदाजी करत क्रिकेटप्रेमींचाही आनंद द्विगुणीत केला.
सामन्याचा आढावा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून कर्णधार सॅम करन (Sam Curran) याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 29 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांचा पाऊस पाडत 55 धावा कुटल्या होत्या. या जोरावर पंजाबने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 214 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने 44, सूर्यकुमार यादवने 67 आणि कॅमरून ग्रीनने 57 धावांची खेळी केली. टीम डेविड याने 13 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. मात्र, यावेळी त्याला स्ट्राईक न मिळाल्याने, त्याला संघाला विजयी करता आले नाही. (Fast Bowler Arshdeep Singh wreaked havoc last over broke two stump in 2 balls video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या घातक यॉर्करने दोनदा मोडला मिडल स्टंप! आयपीएलला मोठे नुकसान
हिटमॅन एक नंबर! आयपीएलची भारतीय सिक्स हिटिंग मशीन बनला रोहित, केला खास विक्रम