रविवारी(10 नोव्हेंबर) वेस्ट इंडिज महिला विरुद्ध भारतीय महिला संघात(West Indies Women vs India Women) दुसरा टी20 सामना(2nd T20I) सेंट लुसिया येथे पार पडला. या सामन्यात भारतीय महिलांनी दमदार कामगिरी करताना 10 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या विजयात सलमीला फलंदाजी करणाऱ्या शेफाली वर्माने(Shafali Verma) 35 चेंडूत नाबाद 69 धावा करत महत्त्वाचा वाटा उचलला. तिने या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. तिने तिचे अर्धशतक केवळ 26 चेंडूत पूर्ण केले होते.
त्यामुळे ती महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत(Fastest fifties for India in Women’s T20I) तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर स्म्रीती मंधना(Smriti Mandhana) आहे. मंधनाने याचवर्षी न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सामन्यात 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. तर त्यापूर्वी तिने 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध टी20 सामन्यात 25 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.
रविवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 103 धावा करत भारताला विजयासाठी 104 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली आणि मंधनाने 104 धांवांची नाबाद सलामी भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. यामध्ये मंधनाचे 30 धावांचे योगदान होते.
शेफालीने तेंडुलकरचा मोडला आहे विक्रम –
15 वर्षीय शेफालीने शनिवारी(9 नोव्हेंबर) वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. हे तिचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती.
हा विक्रम करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा 30 वर्षे जूना विक्रम मोडला आहे. शेफालीने शनिवारी जेव्हा हा विक्रम केला तेव्हा तिचे वय 15 वर्षे 285 दिवस इतके होते. तर 30 वर्षापूर्वी 16 वर्षे 214 दिवस एवढे वय असताना सचिनने 24 ऑक्टोबर 1989 ला पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक केले होते.
आंतरराष्ट्रीय महिला टी20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू –
24 चेंडू – स्म्रीती मंधना (विरुद्ध न्यूझीलंड, 2019)
25 चेंडू – स्म्रीती मंधना (विरुद्ध इंग्लंड, 2018)
26 चेंडू – शेफाली वर्मा (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)
29 चेंडू – हरमनप्रीत कौर (विरुद्ध श्रीलंका, 2018)