---Advertisement---

एफसी गोवाचे प्रयत्न फळले, जॉर्ज ऑर्टीजच्या निर्णायक गोलने चेन्नईयन एफसीला केले पराभूत

On: रविवार, जानेवारी 9, 2022 12:40 AM
fc-goa
---Advertisement---

गोवा (दिनांक ८ जानेवारी) – प्रयत्नांती परमेश्वर याची प्रचिती आज एफसी गोवा संघाला आली असेल. इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात चेन्नईयन एफसीची बचाव भिंत ओलांडण्यात गोवाला सातत्यानं अपयश येत होते. चेन्नईयनचा गोलरक्षक देबजीत मजुमदार हा एफसी गोवासमोर अभेद्य भिंतीसारखा उभा होता, परंतु गोवाच्या खेळाडूंनी आक्रमण थांबवले नाही. ८२व्या मिनिटाला त्यांना मजुमदारची बचाव भिंत ओलांडता आली आणि जॉर्ज ऑर्टीजनं एफसी गोवासाठी गोल केला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला अन् एफसी गोवानं या पर्वातील तिसरा विजय मिळवला. या विजयासह एफसी गोवा ८व्या स्थानी सरकले आहेत.

दोन वर्षांनंतर मैदानावर उतरलेल्या अन्वर अलीनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हृदयाच्या रोगामुळे त्याला दोन वर्ष फुटबॉलपासून लांब रहावे लागले होते, १७ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत या खेळाडूनं आपली छाप पाडली होती. त्याच्या आजारपणामुळे त्याला खेळण्याची परवानगी मिळत नव्हती, परंतु त्यानं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले अन् अखेर त्याला परवानगी मिळाली. आज त्यानं एफसी गोवा संघाकडून आयएसएलमध्ये पदार्पण केलं. चेन्नईयन एफसीविरुद्धच्या या सामन्यात गोवा संघाचा कस लागणार हे निश्चित होते.

चेन्नईयनच्या मिर्लान मुर्झाएव्हनं तिसऱ्या मिनिटाला चेंडू गोलपोस्ट नजीक नेला होता, परंतु इथे त्यानं स्वार्थीपणा दाखवला. चेंडू सहकाऱ्याला पास न करता स्वतः थेट निशाणा साधला, परंतु चेंडू गोलपोस्टच्या खूप वरून मैदानाबाहेर गेला. १९व्या मिनिटाला अल्बेर्टो नोगुएरा व जॉर्ज ऑर्टीझ या एफसी गोवा संघाच्या खेळाडूंचा प्रयत्न गोलरक्षक देबजीत मजुमदार यानं सुरेखरित्या अडवला. ३९व्या मिनिटाला मजुमदारनं आणखी एक अप्रतिम सेव्ह केला. पहिल्या हाफमधील भरपाई वेळेत एफसी गोवाला गोल करण्याच्या दोन सुरेख संधी मिळाल्या होत्या, परंतु याहीवेळेस मजुमदार त्यांच्यासमोर उभा राहिला. पहिल्या हाफमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली असली तरी चेन्नईयन एफसीचा गोलरक्षक देबजीत मजुमदारनं बाजी मारली.

दुसऱ्या हाफच्या दुसऱ्याच मिनिटाला जॉर्ज ऑर्टीजनं कॉर्नरवरून आलेल्या क्रॉसवर गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडूला अंतिम स्वरून देण्यापूर्वी चेन्नईयन एफसीच्या व्लॅदिमिर कोमाननं त्याची जर्सी खेचली. त्यानंतर ऑर्टीजनं टोलावलेला चेंडू गोलपोस्टवरून निघून गेला. ऑर्टीजनं अम्पायरकडे याबाबत दाद मागितली, परंतु त्याचा काही फरक पडला नाही. ५१व्या मिनिटाला एडू बेडियानं कॉर्नरवरून मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून माघारी फिरला अन् याहीवेळेस एफसी गोवाची पाटी कोरी राहिली. एफसी गोवाकडून सातत्यानं आक्रमण होत होते. पण, चेन्नईयन एफसीकडून तितकाच सुरेख बचाव होताना दिसला. त्यामुळे एफसी गोवा संघाच्या खेळाडूंना दूरूनच गोल करण्याचे प्रयत्न करावे लागले. पेनल्टी बॉक्समध्ये चेन्नईयनचे बचावपटू त्यांना फार संधी देत नव्हते.

७१व्या मिनिटाला चेन्नईयन एफसीनं लालिआंझुआला छांग्टे व ल्युकास गिकिविच या अनुभवी खेळाडूंना मैदानावर उतरवले अन् चेन्नईयचा आक्रमण सुरू झाला. ७५व्या मिनिटाला त्यांच्याकडून प्रथमच शॉर्ट ऑन टार्गेट मारला गेला. ग्लान मार्टिन्सचा हा प्रयत्न एफसी गोवाच्या नवीन कुमारनं अडवला. जॉर्ज ऑर्टीजनं अपयाशाची मालिका खंडीत केली आणि ८२व्या मिनिटाला दुरूनच लेफ्ट फूटनं चेंडू गोलजाळीच्या दिशेनं भिरकावला, यावेळेस मजुमदारला कोणतीच संधी मिळण्यापूर्वी चेंडू गोलजाळीत विसावला. एफसी गोवानं १-० अशी आघाडी घेतली. या गोलनंतर एफसी गोवा बचावात्मक मोडमध्ये गेले. एफसी गोवानं हा सामना १- ० असा जिंकला.

निकाल – एफसी गोवा १ ( जॉर्ज ऑर्टीज ८२ मि. ) विजयी विरूद्ध चेन्नईयन एफसी ०.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---