गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एफसी गोवा संघाने हैदराबाद एफसीविरुद्ध पिछाडीवरून 2-1 अशी बाजी मारली. पदार्पण करणारा बदली स्ट्रायकर इशान पंडिता याने तीन मिनिटे बाकी असताना बरोबरी साधून दिली. त्यानंतर भरपाई वेळेत स्पेनचा स्ट्रायकर इगोर अँग्युलो याने सनसनाटी विजय साकार केला.
वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. गोव्याने या विजयासह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. 9 सामन्यांत त्यांचा हा चौथा विजय असून दोन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. हैदराबादला आठ सामन्यांत तिसरी हार पत्करावी लागली असून दोन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण व आठवे स्थान कायम राहिले. एटीके मोहन बागान 17 गुणांसह आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चौथ्या क्रमांकावर जमशेदपूर एफसी असून त्यांचे 9 सामन्यांतून 13 गुण आहेत.
आघाडी फळीतील स्पेनचा 33 वर्षीय खेळाडू अरीडेन सँटाना याने 58व्या मिनिटाला हैदराबादचे खाते उघडले. बचाव फळीतील आशिष राय याने ही चाल रचली. त्याने उजवीडून दिलेल्या अचूक क्रॉस पासनंतर सँटानाने हेडिंगवर लक्ष्य साधताना गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याला चकवले.
गोव्याने अखेरच्या क्षणी कलाटणी दिली. तीन मिनिटे बाकी असताना मिळालेली फ्री किक मध्यरक्षक एदू बेदिया याने घेतली. त्यावर दिल्लीच्या 22 वर्षीय इशानने हेडिंगद्वारे अफलातून फिनिशींग केले. मग मुळ पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला बदली मध्यरक्षक अल्बर्टो नोग्युरा याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून बॉक्सलगत डावीकडे असलेल्या अँग्युलो याला पास दिला, अँग्युलोने मग हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनैन्डीया याला चकवून शानदार फटका मारत गोल केला.
हैदराबादची सुरवात आश्वासक होती. हैदराबादचा बचावपटू आशिष राय याने दुसऱ्याच मिनिटाला प्रयत्न केला, पण तो फिशिशींग करू शकला नाही. सातव्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू सेरीटॉन फर्नांडिस याने उजवीकडून मुसंडी मारली, पण हैदराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याने त्याचा क्रॉस शॉट अडवला.
सामन्यातील पहिला कॉर्नर गोव्याला दहाव्या मिनिटाला मिळाला. मध्यरक्षक जोर्गे मेंडोझाने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून मध्य फळीतील सहकारी रोमारीओ जेसुराज याला पास दिला. जेसुराजने मारलेला चेंडू हैदराबादचा बचावपटू चिंगलेनसाना सिंग याने हेडिंगद्वारे बाहेर घालवला. त्यामुळे गोव्याला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस याने कॉर्नर घेताना चेंडू बॉक्समध्ये मारला. बचावपटू जेम्स डोनाची याने उडी घेत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती.
तेराव्या मिनिटाला मेंडोझाने मध्य क्षेत्रातून पास दिल्यानंतर अँग्युलोने थोडे आधीच धावण्यास सुरवात केली. त्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला. 27व्या मिनिटाला हैदराबादला फ्री किक मिळाली. मध्यरक्षक हिदेश शर्माने चेंडू बॉक्समध्ये मारला, पण गोव्याच्या बचाव फळीला तो रोखण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. पहिल्या सत्राच्या अखेरीस थोडी चुरस झाली. 41व्या मिनिटाला रायने उजवीकडून आगेकूच केली, पण त्याचा क्रॉस शॉट खराब होता. त्यामुळे ही चाल वाया गेली. 43व्या मिनिटाला गोव्याचा मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडीस याने उजवीकडून चेंडू मारला. त्याच्या पासवर अँग्युलोने हेडिंग केले, पण ते स्वैर होते.
दुसऱ्या सत्रात हैदराबादने चालींचा धडाका लावला. 50व्या मिनिटाला बचावपटू आकाश मिश्राने डावीकडून मुसंडी मारली होती. 53व्या मिनिटाला हालीचरण नर्झारीने मध्य फळीतील सौविक चक्रवर्तीला पास देण्याचा प्रयत्न केला. पण तो चुकल्याने गोव्याला प्रतिआक्रमणाची संधी मिळाली. अशावेळी आकाश मिश्राने चपळाई दाखवत चेंडूवर ताबा मिळवला. 54व्या मिनिटाला हालीचरण नर्झारीच्या पासवर मध्यरक्षक जोओ व्हिक्टर याने प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू थेट नवाझकडे गेला. खाते उघडल्यानंतर सँटानाने 62व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न केला, पण नवाझने चेंडू थोपवला.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: आज हैदराबाद एफसी विरुद्ध एफसी गोवा संघात रंगणार सामना
– आयएसएल २०२०: चेन्नईयीनशी बरोबरीमुळे एटीके मोहन बागानची आघाडी
– आयएसएल २०२० : बेंगळुरूला धक्का देत जमशेदपूर तिसऱ्या स्थानी; स्टीफन इझेचा निर्णायक गोल