पुणे | राजेश वाधवान समूह व बॉलिवूडस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने 2018-19च्या मौसमासाठी उरुग्वेच्या मार्टिन डायझ याला करारबद्ध केले असून तो आता एफसी पुणे सिटी संघाकडून खेळणार आहे.
एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आयएसएलमधील संपूर्ण मौसमाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मार्टिन याच्या समावेशाने संघाच्या बचावफळीची ताकद वाढणार आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू असून मध्यमध्यमफळी किंवा बचावफळीत खेळण्याचा त्याचा हातखंडा आहे. तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि चेंडूवर उत्तम ताबा असल्यामुळे त्याचा समावेश ही संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
मार्टिन याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2008मध्ये डिफेंसॉर स्पोर्टींगकडून केली. त्यानंतर तो डायनामो बुकुरेस्टी, सीडी बडजोझ, मोंन्टेव्हिडीओ वंडरर्स, लेटिको राफेला आणि प्रायमेरा डिव्हीजनमधील लिव्हरपूल एफसी संघाकडून खेळत होता. गतवर्षी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाने त्याला करारबद्ध केले होते आणि यासंघाकडून तो 16 सामने खेळला आहे. 2005 मध्ये फिफा 17 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मार्टिनने राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषविले होते.
एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिगुल एंजल पोर्तुगल म्हणाले कि, गत मौसमात मी मार्टिनचा खेळ पाहिला आहे. त्याच्या खेळातील नैतिकता आणि अनुकूलनक्षमता पाहून मी भारावलो होतो. त्याच्यातील उत्साह आणि प्रदीर्घ अनुभव हा आमच्या संघातील युवा खेळाडूंसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आमच्या क्लबमध्ये त्याचे मी स्वागत करतो आणि त्याचा समावेश हा क्लबसाठी तसेच चाहत्यांसाठी सकारात्मक ठरेल अशी आशा आहे.
यावेळी मार्टिन म्हणाला की, एफसी पुणे सिटी संघाची गतवर्षीची कामगिरी मी पाहिली आहे. संघात सहभागी झाल्यावर क्लबमधील व सभोवताली असलेले त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन जाणवला आणि त्यामुळेच क्लब याआधीच्या मौसमात भरीव यश संपादन करू शकला आहे. नव्या संघाकडून खेळण्यास मी उत्सुक असून नव्हे आव्हाहन स्वीकारण्यास मी सज्ज आहे.