बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 25 वा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 4 विकेट्स विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयात कर्णधार केन विलियम्सनने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
विलियम्सनने या सामन्यात 138 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. याबरोबरच त्याने इंग्लंडमध्ये वनडेत 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये विलियम्सन सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने इंग्लंडमध्ये खेळताना 17 वनडे डावात 1000 धावांचा टप्पा गाठला आहे.
याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. त्याने इंग्लंडमध्ये 18 वनडे डावात 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला होता.रोहितने रविवारी(16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली होती.
इंग्लंडमध्ये सर्वात जलद 1000 वनडे धावा करण्याच्या यादीत विलियम्सन आणि रोहितच्या पाठोपाठ शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिखरला इंग्लंडमध्ये 1000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 19 डाव लागले. विशेष म्हणजे त्यानेही या विश्वचषकातच या विक्रमाला गवसणी घातली आहे. सध्या तो या विश्वचषकातून अंगठ्याच्या दुखापतीने बाहेर पडला आहे.
विलियम्सनचे आता इंग्लंडमध्ये 17 डावात 74.28 च्या सरासरीने 1040 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 शतकांचा आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
बुधवारी पार पडलेला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना प्रत्येकी 49 षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 6 बाद 241 धावा केल्या होत्या आणि 242 धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते.
न्यूझीलंडने हे आव्हान विलियम्सनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 48.3 षटकात 6 बाद 245 धावा करत सहज पार केले.
इंग्लंडमध्ये सर्वात जलद 1000 वनडे धावा करणारे क्रिकेटपटू –
17 डाव – केन विलियम्सन
18 डाव – रोहित शर्मा
19 डाव – शिखर धवन
21 डाव – विवियन रिचर्ड्स
22 डाव – राहुल द्रविड/मार्कस ट्रेसकॉथिक
23 डाव – जॉनी बेअरस्टो
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शिखर धवनने विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ
–या कारणामुळे शिखर धवन विश्वचषक २०१९मधून पडला बाहेर
–पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे गमतीशीर उत्तर, पहा व्हिडिओ