मुंबई उपनगर कबड्डी असो.ने, मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने आयोजित केलेल्या ” मुंबई महापौर चषक ” कबड्डी स्पर्धेत महिंद्राने पुरुषांत, तर महात्मा गांधीने महिलांत विजेतेपद मिळविले.
महिंद्राचा आनंद शिंदे पुरुषांत,तर शिवशक्तीची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.दोघांनाही प्रत्येकी रोख रु. पंधरा हजार (₹ १५,०००/-) देऊन गौरविण्यात आले.
कुर्ला नेहरू नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने महाराष्ट्र पोलिसांचे कडवे आव्हान २८-२४ असे संपवित ” महापौर करंडक” व रोख रु.एक लाख (₹ १,००,०००/-) आपल्या नावे केले.
उपविजेत्या महाराष्ट्र पोलीस संघाला करंडक व रोख रु. पन्नास हजार (₹ ५०,०००/-)वर समाधान मानावे लागले. चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पोलिसांनी महिंद्राच्या आनंद पाटीलची पकड करीत पहिला गुण घेतला.
पुन्हा चढाईत गडी टिपत २-०अशी आघाडी घेतली. महिंद्राच्या ओमकार जाधवने चढाईत गुण घेत महिंद्राने खाते उघडले. यानंतर सतत गुणांचे फारडे दोलायमान स्थितीत हलत होते.
कधी एकाद्या-दुसऱ्या गुणाची आघाडी महिंद्राकडे येत होती,तर कधी पोलिसांकडे. मध्यांतराला ११-१०अशी पोलीस संघाकडे आघाडी होती. असा खेळ जवळपास ३२-३३मिनिटे सुरू होता. यानंतर महिंद्राने अजिंक्य पवारला खेविण्याची चाल खेळली. त्याने आपल्या एकाच चढाईत ३गडी टिपत पोलिसांवर पहिला लोण देण्यात मोलाचा वाटा उचलला.
सामना संपायला सहा-सात मिनिटे असताना महिंद्राने पोलिसांवर लोण देत २४-१७अशी आघाडी घेतली. येथेच पोलिसांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. अजिंक्य पवार, ओमकार जाधव, सुहास वगरे या विजयाचे शिल्पकार ठरले.
नामदेव इस्वलकर, महेश मगदूम यांचा खेळ पोलिसांचा पराभव टाळण्यास कमी पडला.त्यातच सुलतान डांगे जायबंदी झाल्याने त्यांच्यावरील दबाव अधिक वाढला. याचा परिणाम पोलिसांचा पराभव होण्यात झाला.
महिलांच्या अंतिम सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधीने गतविजेत्या शिवशक्तीचा ३१-१९ असा सहज पराभव करीत रोख रु एक लाख (₹ १,००,०००/-) व “महापौर करंडकावर” आपले नाव कोरले.
महात्मा गांधीने सुरुवातच एवढी आक्रमक केली की, ८व्या मिनिटाला शिवशक्तीवर लोण देत ९–१अशी आघाडी घेतली. त्यानंतर शिवशक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मध्यांतराला महात्माकडे १४-०९ अशी आघाडी होती.
हा ५ गुणांचा फरक शेवटच्या ५मिनिटापर्यंत कायम होता. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना शिवक्तीला नामी संधी आली होती.त्या वेळी महात्माच्या अंगणात पूजा किणी आणि एक खेळाडू शिल्लक होती.
त्यावेळी पूजाने चढाईत बोनस गुणास एक गडी टिपत संघाच्या विजयाच्या आशा शिल्लक ठेवल्या. त्यानंतर रक्षा नारकरची अव्वल पकड व नंतर रेखा सावंतची पकड करीत यावर शिक्कामोर्तब केले.
रक्षा आणि रेखा यांच्या मोक्याच्या क्षणी झालेल्या पकडी शिवशक्तीला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेल्या. पूजा किणी, सृष्टी चाळके, प्रतीक्षा मांडवकर,तेजस्वीनी पाटेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. शिवशक्तीकडून रेखा सावंत, रक्षा नारकर, पौर्णिमा जेधे यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यात कमी पडला.
या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महिंद्राने देना बँकेला ४०-२०असे, तर महाराष्ट्र पोलीसने मुंबई बंदराला २४-१६ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.
महिलांत महात्मा गांधीने संघर्षला ३३-२० असे, तर शिवशक्तीने मुं. पोलिसांना २७-२०असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. या चारही उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी करंडक व रोख रु. पंचवीस हजार (₹ २५,०००/-) प्रदान करण्यात आले.
पुरुषांत महाराष्ट्र पोलिसचा नामदेव इस्वलकर, महिंद्राचा सुहास वगरे अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पंकडीचे खेळाडू ठरले. महिलांत हा मान पूजा किणी, सृष्टी चाळके यां महात्माच्या दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे चढई व पकडी करिता मिळविला.
या चारही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. दहा हजार (₹ १०,०००/-) देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विभागीय आमदार मंगेश कुडाळकर, युना नेते अमोल किर्तीकर, नगरसेवक विजय तांडेल, बाजार समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, विभागीय नगरसेविका प्रविणा मोरजकर, अर्जुनवीर अशोक शिंदे, माया मेहेर (अर्जुन पुरस्कार),स्पर्धा निरीक्षक मनोहर इंदुलकर, राष्ट्रीय खेळाडू अमर पवार व उपनगर कबड्डी असो. च्या सर्व पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत पार पडला.