माजी क्रिकेटपटूंसाठी खेळल्या जाणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट या स्पर्धेचा दुसरा हंगाम सप्टेंबर महिन्यात भारतातील विविध शहरांत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत चार संघ सामील होतील. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा इंडिया महाराजा हा संघ इतर देशांच्या निवृत्त खेळाडूंच्या रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाशी एक खास सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा नुकतीच झाली आहे. मात्र, त्यानंतर रेस्ट ऑफ वर्ल्ड संघात सामील केल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्समूळे एक वाद चांगलाच पेटला होता. आता त्या वादावर पडदा टाकण्यात आला असून, त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज खेळाडूची वर्णी लागली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाल्यावर, रेस्ट ऑफ वर्ल्ड संघात हर्शेल गिब्सचे नाव पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी रोष व्यक्त केला होता. गिब्स याने मागील वर्षी पाकिस्तानच्या कश्मीरमधील वादग्रस्त कश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच, या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत भारत देशाविरुद्ध विधाने केली होती. गिब्सला भारतात खेळण्यासाठी बोलावले याकरिता काहींनी तर बॉयकॉट सौरव गांगुली असा ट्रेंडही केलेला. गांगुली या सामन्यात इंडिया महाराजा संघाचा कर्णधार म्हणून सहभागी होणार होता.
स्पर्धेच्या आयोजकांकडून देण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार हर्शेल गिब्स व श्रीलंकेचा महान सलामीवीर सनथ जयसूर्या यांनी स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन व न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरी यांची वर्णी लागली आहे. इंडिया महाराजा विरूद्ध रेस्ट ऑफ वर्ल्ड हा सामना १६ सप्टेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. यामध्ये इंडिया महाराजाचे नेतृत्व सौरव गांगुली तर रेस्ट ऑफ वर्ल्डचे नेतृत्व इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन हा करेल.