आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका कोण बजावणार? रिंकू सिंग, हार्दिक पांड्या की दिनेश कार्तिक? आयपीएलच्या या हंगामातील आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिनेश कार्तिक या शर्यतीत आघाडीवर आहे.
38 वर्षीय दिनेश कार्तिकनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 35 चेंडूत 83 धावांची झंझावाती खेळी केली. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 7 षटकार ठोकले. यापूर्वी दिनेश कार्तिकनं आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूला पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात त्यानं 10 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली होती.
आयपीएल 2024 मध्ये दिनेश कार्तिकनं आतापर्यंत 6 डावात 204.45 च्या स्ट्राईक रेटनं 226 धावा केल्या आहेत. मात्र दुसरीकडे रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्याची बॅट शांतच आहे. हार्दिक पांड्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 चेंडूत 21 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र या व्यतिरिक्त इतर सामन्यांमध्ये तो अपयशीच ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंहला देखील या हंगामात त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
दुसरीकडे, दिनेश कार्तिक आरसीबीसाठी अखेरच्या षटकांमध्ये सहज चौकार आणि षटकार मारतोय. मुंबई इंडियन्सविरुद्ध दिनेश कार्तिकनं अवघ्या 23 चेंडूत नाबाद 53 धावांची झंझावाती खेळी खेळली होती. आपल्या या खेळीत त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. दिनेश कार्तिकचा हा फॉर्म पाहता त्याचा टी-20 विश्वचषकाच्या संघात फिनिशर म्हणून समावेश केला जाऊ शकतो.
जर आपण दिनेश कार्तिकच्या टी20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं भारतासाठी 60 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 26.38 ची सरासरी आणि 142.62 च्या स्ट्राईक रेटनं 686 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकनं भारताकडून खेळताना केवळ एक अर्धशतक ठोकलं आहे.
आयपीएलच्या 249 सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकच्या नावावर 134.98 चा स्ट्राईक रेट आणि 26.64 च्या सरासरीनं 4742 धावा आहेत. दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये 22 अर्धशतक ठोकली आहेत. 97 ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!