NZ vs PAK 3rd T20I: ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात, न्यूझीलंडने पाकिस्तानचा 45 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. प्रथम खेळताना न्यूझीलंडने 20 षटकांत 224 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान संघ संपूर्ण षटके खेळून केवळ 179 धावा करू शकला. किवी फलंदाज फिन ऍलन याला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
पाकिस्तानने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो चौथ्या षटकात 7 धावा काढून हारिस रौफ याचा शिकार ठरला. दुसरा सलामीवीर फिन ऍलन याने पाकिस्तानी गोलंदाजांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आणि 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला टीम सेफर्ट याची साथ लाभली, ज्याने 23 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली आणि दुसऱ्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून धावसंख्या 150 च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
ही भागीदारी मोहम्मद वसीम याने तोडली आणि सेफर्ट 14व्या षटकात 153 धावांवर बाद झाला. डॅरिल मिचेल हाही स्वस्तात बाद झाला आणि त्याच्या बॅटमधून 8 धावा आल्या. परंतु, फिन ऍलनने (Finn Allen) एक बाजू लाऊन धरली आणि षटकार मारणे सुरूच ठेवले आणि 48 चेंडूत न्यूझीलंडच्या टी20 इतिहासातील तिसरे जलद शतक झळकावले.
18व्या षटकात 203 धावांवर बाद होण्यापूर्वी ऍलनने 62 चेंडूत 6 चौकार आणि 16 षटकारांसह 137 धावा केल्या. कोणत्याही किवी फलंदाजाकडून टी20मध्ये या सर्वाधिक धावा आहेत. ग्लेन फिलिप्स याने 19 धावांची खेळी खेळली आणि आपल्या संघाला पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले. पाकिस्तानकडून हारिस रौफने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या मात्र त्याने 60 धावा दिल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात विशेष झाली नाही आणि चौथ्या षटकातच सलामीवीर सॅम अयुब 10 धावा करून बाद झाला. दुसरा सलामीवीर मोहम्मद रिझवान हाही फार काळ टिकला नाही आणि आठव्या षटकात तोही 24 धावा करून बाद झाला. फखर जमान याने 10 चेंडूत 19 धावा केल्या आणि आझम खान 7 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मात्र, बाबर आझम याने एका बाजूने सातत्य राखत काही उत्कृष्ट फटके मारले. दरम्यान, इफ्तिखार अहमद 15 व्या षटकात 1 धावांवर धावबाद झाला. त्याच वेळी, बाबरने मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले आणि 16 व्या षटकात 37 चेंडूत 58 धावा केल्यानंतर तोही पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद नवाजने 15 चेंडूत 28 धावा केल्या, तर कर्णधार शाहीन आफ्रिदी 16 धावांवर नाबाद राहिला पण तो आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. (Finn Allen’s storm destroys Pakistani bowling New Zealand pocket the series 3-0)
हेही वाचा
‘आम्ही रोज तुमचीआठवण काढतो’; वडिलांच्या पुण्यतिथीदिनी हार्दिक-क्रुणाल भावूक, शेअर केली खास पोस्ट
‘असा गुण जो विराट, सचिन आणि धोनीमध्येही नाही?’ दादाने दिले एका शब्दात जबरदस्त उत्तर