मुंबई:- ओम् पिंपळेश्वर, अमर क्रीडा, विजय नवनाथ, लायन्स स्पोर्टस् यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात ओम् पिंपळेश्वरने बंड्या मारुतीला ३१-२४ असे नमविले. ओमकार जाधव, विजय ढवळे यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या जोरावर ओम् पिंपळेश्वरने पूर्वार्धात २१-१० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सावध खेळ करणाऱ्या ओम् पिंपळेश्र्वरला उत्तरार्धात बड्या मारुतीने ३ अव्वल पकड व बोनस गुण घेत कडवी लढत दिली. रोशन परब, प्रणित देसाई बड्या मारुती संघाकडून उत्तम खेळले.
दुसऱ्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने पहिल्या सत्रातील १६-२५ अशा पिछाडीवरुन यंग प्रभादेवी मंडळाचा प्रतिकार ४५-२६ असा मोडून काढला. यंग प्रभादेवीच्या शिवकुमार पाटील, स्मित साळवी, संजय म्हात्रे यांनी आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत ९ गुणांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात ती त्यांना राखता आली नाही. अमरच्या अक्षय पांचाळ, अमन साळवी यांनी आपला बचाव भक्कम राखत धाडशी पकडी करीत भराभर गुण घेतले. त्यांना करण सावर्डेकरने चढाईत गडी टिपत उत्कृष्ट साथ देत २१ गुणांच्या मोठ्या फरकाने संघाचा विजय साकारला. यंग प्रभादेवी संघ उत्तरार्धात अगदीच दुबळा ठरला. विजय नवनाथने धीरज मेगे, तेजस वर्दंम, योगेश सुर्वे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सूर्यकांत व्यायाम मंडळाला २४-२१ असे नमवित आगेकूच केली. सूर्यकांतकडून साहिल तवटे, मंदार ठोंबरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. शेवटच्या सामन्यात लायन्स क्लबने विजय बजरंग व्यायाम शाळेचा प्रतिकार ३८-२२ असा मोडून काढला. राज आचार्य, शुभम मटकर, लायन्स कडून, तर अक्षय उगाडे, गणेश तुपे विजय बजरंग कडून उत्कृष्ट खेळले.
महत्वाच्या बातम्या –
दुसरा कसोटी सामना भारताच्या नियंत्रणात असणार? ‘असा’ आहे वायझॅक स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड
IND vs ENG । अश्विन पार करणार तीन मैलाचे दगड, ठरणार ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय