दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपचा मेळा भरला. टीम इंडियाचे सारे सीनियर स्वतःहून खाली बसले. दोन-तीन वर्ष आधीच इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला सुरू केलेला धोनी कॅप्टन बनलेला. कुणाच्या ध्यानीमनी नसताना तो टीमला फायनलला घेऊन गेला. फायनल होती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध. ग्राउंडवरची मॅच सोडा इकडं दोन्ही देशातल्या जनतेचेच महायुद्ध सुरू झालेल. इतक्यात खबर आली टिमचा सगळ्यात अनुभवी बॅटर वीरेंद्र सेहवाग ही फायनल खेळणार नाही, त्याला दुखापत झालीय. त्याच्या जागी ओपनिंग करणार होता युसुफ पठाण.
त्यावेळी क्रिकेट फॉलो करणाऱ्यांना इरफान पठाणचा मोठा भाऊ इतकीच युसुफची ओळख माहीत होती. स्वतः कॅप्टन धोनीला पण तो कसा खेळतो हे वर्ल्डकपआधी माहीत नव्हते. मॅच सुरू व्हायच्या आधी त्याला धोनीने फक्त तू फायनल खेळणार असल्याच सांगितलेलं. युसुफने ही बातमी त्या वेळी टीमचा मेन बॉलर असलेल्या आपल्या भावाला इरफान पठाणला सांगितली. दोघे भाऊ देशाला वर्ल्डकप देऊ असं म्हणत इरफान जवळजवळ नाचायला लागला. फायनलला इंडिया पहिली बॅटिंग करत होती. युसुफने पहिल्याच ओव्हरला लंबा छक्का मारला आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाऊल टाकले.
आता इरफान पठाणची स्ट्रगल स्टोरी सगळ्यांना माहीतच आहे. अगदी तशीच म्हशीच्या मैदानापासूनच युसुफची पण स्टोरी सुरू होते. इरफान जितक्या लवकर इंटरनॅशनल क्रिकेट खेळला तितक्या लवकर फक्त युसुफला ही संधी मिळाली नाही. वर्ल्डकप फायनलला इंटरनॅशनल डेब्यू करणारा कदाचित तो एकटा इंडियन असावा.
हेही पाहा- इरफान पठाणचा भाऊ ही ओळख पुसून युसुफ टी२० चा किंग बनला
सात आठ वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळल्यानंतर युसुफला ओळख मिळाली आयपीएलमधून. टुर्नामेंटची सगळ्यात कमजोर टीम म्हणलेल्या राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवण्यात हाच युसुफ आघाडीवर होता. शेन वॉर्न, शेन वॉटसन आणि सोहेल तन्वीर यांच्यासोबत तो टीमचा मेन खांब ठरलेला. तुफानी बॅटिंगच्या जोडीला हमखास विकेट घ्यायची त्याची क्षमता साऱ्या जगाने त्या पहिल्या सिझनला पाहिली. इथुनच त्याचे एक टीम इंडियातील पुनर्प्रवेशचे दरवाजे खुले झाले. टीम इंडियात आल्यावर भाऊ इरफानसोबत तो टीमचा फिनिशर बनला. श्रीलंकेला दोघा भावांनी एकहाती पाणी पाजलेली मॅच कोणताच क्रिकेटप्रेमी कसा विसरेल?
पुढे दोन सिझन राजस्थान रॉयल्सने कच खाल्ली, पण युसुफ आपल्या टॉप फॉर्ममधेच राहिला. टीम इंडियात त्याची जागा फिक्स झाली. न्युझीलंड, साउथ आफ्रिकेत त्याने शतक मारली. सचिनचे स्वप्न पूर्ण करायला टीम इंडियाने जिंकलेल्या २०११ वर्ल्डकपचे मेडलही त्याच्या गळ्यात पडले. नेमकी त्याच वर्षी त्याची आयपीएल टीम बदलली. राजस्थान सोडून तो केकेआरकडे आला. केकेआर मॅनेजमेंटने त्याला फ्रीहॅंड दिला आणि गडी इथेही सुसाट सुटला. प्रत्येक सीझनला त्याची हवा होत होती, पण टीम इंडियातून जागा गेली. चार वर्षात मात्र त्याने केकेआरला दोनदा चॅम्पियन बनवले. यूसुफ पठाणने केलेली धुलाई काय असते? याचे उत्तर डेल स्टेन चांगले देऊ शकतो.
युसुफचा गेम खराब झाला नसला तरी २०१५च्या आसपास जडेजा हार्दिक पांड्याने मार्केट गाजवायला सुरुवात केली. युसुफ तसाही टी२० स्पेशालिस्टच, पण या नव्या पोरांपुढे त्याचा निभाव लागेना. २०१७ नंतर फॉर्म पूरता डीप झाला. डोमेस्टिकमध्येही बॅट चालेना. पुढे दोन वर्ष सनरायझर्सने त्याला चान्स देऊन पाहिला पण एखाद-दुसरी मॅच सोडून पठाण पावर दिसलीच नाही. अखेर २०२१ ला रिटायर व्हायचा निर्णय त्याने घेतला.
आपल्या खास स्टाईलमध्ये बॅटिंग करताना च्युईंगगम चघळणारा युसुफ आता लिजेंड लीगमध्ये खेळताना दिसतो. तिथे पण त्याच्या इतका झंझावात कोणीच आणत नाही. दुसरीकडे हाच युसुफ भाऊ इरफानसोबत देशभरात क्रिकेट ॲकॅडमी चालवत भारताचे भविष्य घडवतोय. समाजकार्यात योगदान देत दातृत्व दाखवतोय.
ज्या विरेंद्र सेहवागची जागा घेत युसुफने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले, अगदी तसाच बेधडक खेळ तो दाखवत आला. आज आयपीएल आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोज नवनवे टी२० स्टार जन्माला येतात, पण या आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार म्हणजे युसुफ पठाण हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटीत लाभलं शतकाचं सौभाग्य, पण वनडेत नाही करता आली शंभरी, पाहा कोण आहेत ‘ते’ क्रिकेटर्स
‘त्या’ दिवशी सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा भारतीय संघाचा हिरो बनलेला, जाणून घ्या एका क्लिकवर
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत