15 मार्च हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजेच 1877 मध्ये या दिवशी कसोटी क्रिकेटची अधिकृत सुरुवात झाली होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना खेळला गेला.
विशेष म्हणजे त्या कसोटी सामन्यासाठी वेळेची मर्यादा नव्हती. कितीही दिवस लागले तरी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन डाव खेळायचे होते. कसोटी इतिहासातील पहिला सामना 15 ते 19 मार्च दरम्यान पार पडला. पहिल्या 3 दिवसांच्या खेळानंतर चौथा दिवस म्हणजे 18 मार्च 1877 हा विश्रांतीचा दिवस म्हणून ठेवण्यात आला. यानंतर पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियानं 45 धावांनी विजय मिळवला.
सलामीवीर फलंदाज चार्ल्स बॅनरमनसाठी तो ऐतिहासिक कसोटी सामना खूप खास ठरला. बॅनरमननं कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं. एवढंच नाही तर पहिली कसोटी धावही बॅनरमनच्या बॅटमधूनच आली. कसोटी सामन्यातील पहिला चेंडू अल्फ्रेड शॉनं बॅनरमननं टाकला होता. बॅनरमन 165 धावा करून निवृत्त झाला. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 245 धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लिश संघ पहिल्या डावात केवळ 196 धावाच करू शकला. सलामीवीर हॅरी जपनं सर्वाधिक 63 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बिली मिडविंटरनं पाच बळी घेतले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 49 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
यानंतर इंग्लंडनं पलटवार करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 104 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून आल्फ्रेड शॉनं 5 आणि जॉर्ज उलिएटनं 3 विकेट घेतल्या. इंग्लंड संघाला सामना जिंकण्यासाठी 154 धावा करायच्या होत्या, मात्र ते लक्ष्य गाठू शकले नाहीत.
टॉम कँडलच्या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज ढेपाळले. संपूर्ण इंग्लंडचा संघ 108 धावांवर ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलियानं सामना 45 धावांनी जिंकला. इंग्लंडचं तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. यष्टिरक्षक जॉन सेल्बीनं सर्वाधिक 38 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे टॉम कँडलनं 7 आणि जॉन हॉजेसनं 2 गडी बाद केले.
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 2535 सामने खेळले गेले आहेत. इंग्लंडनं सर्वाधिक (1071) सामने खेळले. तर ऑस्ट्रेलियन संघ या बाबतीत (866 सामने) दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 414 तर इंग्लंडनं 392 कसोटी सामने जिंकले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं आतापर्यंत 579 सामने खेळले आहेत. या कालावधीत भारतानं 178 सामने जिंकले, तर तेवढ्याच सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय भारतीय संघाचे 222 कसोटी सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना टाय झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबईवर पैशांचा पाऊस, MCA ने बक्षिसाची रक्कम केली दुप्पट