आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तारीख जवळ येत आहे. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होईल. यंदाच्या मेगा लिलावासाठी एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असून धक्कादायक म्हणजे यात इटलीच्या एका खेळाडूचाही समावेश आहे! आयपीएलच्या इतिहासात इटालियन खेळाडूनं मेगा लिलावासाठी नोंदणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया कोण आहे हा इटालियन खेळाडू.
थॉमस ड्रेका असं या इटलीच्या खेळाडूचं नाव आहे. त्यानं आतापर्यंत इटलीसाठी चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्यानं ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भाग घेतला होता. थॉमस या स्पर्धेत ब्रॅम्प्टन वुल्व्ह्सकडून खेळला होता. थॉमस हा वेगवान गोलंदाज आहे, ज्यानं इटलीसाठी चार टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/9 होती. थॉमसनं टी20 मध्ये अवघ्या 4.25 च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या आहेत. आता त्याला आयपीएलमध्ये कोणी खरेदीदार मिळतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. आफ्रिकेतील एकूण 91 खेळाडू या लिलावात सहभागी होतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियातील एकूण 76 खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.
येथे उल्लेखनीय म्हणजे, मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या 1574 खेळाडूंपैकी फक्त 204 खेळाडू खरेदी केले जातील. अशा परिस्थितीत कोणत्या खेळाडूचं नशीब चमकतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सर्व संघ त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडूंचा समावेश करू शकतात. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी संघांकडे 120 कोटी रुपयांचे पर्स मूल्य आहे. त्यापैकी संघांनी आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करण्यासाठी देखील पैसे खर्च केले आहेत. आता उरलेल्या पैशातूनच संघांना अन्य खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत.
हेही वाचा –
विराट-बाबर आणि रोहित-रिजवान एकाच संघात खेळणार! 20 वर्षांनंतर या स्पर्धेचं पुनरागमन?
आयसीसी क्रमवारीत रिषभ पंतची धमाल, रोहित-कोहली टॉप 20 मधून बाहेर!
रिकी पाँटिंगची भविष्यवाणी! बॉर्डर-गावस्कर मालिकेत हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा