इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा असा विश्वास होता की, युवा फलंदाज रिषभ पंत या कसोटी मालिकेत भारतीय संघासाठी मोठा खेळाडू म्हणून उभा राहील. आत्तापर्यंत या मालिकेत 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांतील 6 डावांमध्ये पंतने कोणतीही खास खेळी खेळलेली नाही, ज्यामुळे त्याची निवड योग्य असल्याचे सिद्ध होईल.
त्यातही नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कठीण परिस्थितीत तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला. यासह त्याच्या नावे कसोटी कारकिर्दीतील सर्वात लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.
पंतने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फक्त 2 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याने फक्त 1 धाव केली होती. यासह पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये 25, 37, 22, 2 आणि 1अशा धावा केल्या आहेत.
दरम्यान लीड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत आणली आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने 59 धावा केल्या, चेतेश्वर पुजाराने 91 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहलीने 55 धावांचे योगदान दिले. पुजारा आणि कोहली बाद झाल्यानंतर संपुर्ण भारतीय फलंदाजी अक्षरशः कोलमडली व भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता दोन्ही देशांमधील पुढील कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून द ओव्हल येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑली रॉबिन्सनचा कहर! भारताच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ
पुजाराच्या खेळीने ‘या’ खेळाडूचे वाढवले टेंशन; भारताकडून खेळण्यासाठी करावी लागणार आणखी प्रतिक्षा?
बॅकफूटवर असलेल्या पंजाब किंग्जच्या अपेक्षा उंचावल्या, लीड्स कसोटीचा ‘नायक’ आयपीएलमध्ये खेळणार