बुधवार (२३ जून) न्यूझीलंडसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयसीसीच्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. २ वर्षांपासून सुरु असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने उत्तम सांघिक कामगिरी करत भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह आयसीसीच्या नव्या स्पर्ध्यच्या पहिल्या आवृत्तीचा विजेता म्हणून न्यूझीलंड संघाचे नाव इतिहासात कोरले गेले.
या लेखात आपण यापूर्वी आयसीसीच्या पुरुषांच्या विविध स्पर्धेतील पहिल्या आवृत्तीच्या विजेत्या संघांचा आढावा घेऊ.
वनडे विश्वचषक – वेस्ट इंडिज
आयसीसीने १९७५ सालापासून पुरुषांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी बलाढ्य वेस्ट इंडिज संघाने क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपदावर नाव कोरले. त्यावेळी प्रत्येकी ६० षटकांचे सामने या विश्वचषकात खेळवण्यात आले होते. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी मात करत वनडेतील पहिला विश्वविजेता संघ होण्याचा मान मिळवला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी – दक्षिण आफ्रिका
आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला २३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९८ साली सुरुवात झाली. पहिली स्पर्धा बांगलादेशमध्ये ९ संघांत खेळवली गेली होती. या स्पर्धेत अंतिम सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात खेळवण्यात आला होता. ढाकामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्सने विजय मिळवत पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.
टी२० विश्वचषक – भारत
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोटे स्वरुप समजल्या जाणाऱ्या टी२० क्रिकेटचा पहिला विश्वचषक २००७ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आला. या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला केवळ ५ धावांनी पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. त्यावेळी एमएस धोनीने पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले होते. तसेच अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने पहिला टी२० क्रिकेटमधील विश्वविजेता संघ ठरण्याचा पराक्रम केला होता.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा – न्यूझीलंड
कसोटी क्रिकेटमध्ये रंगत आणण्यासाठी आयसीसीने २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये चूरस होती. ही चूरस शेवटपर्यंत टिकून राहिली. अखेर भारत आणि न्यूझीलंड संघाने बाजी मार अंतिम सामना खेळण्याचा मान मिळवला. अंतिम सामन्यातही पावसाने अनेकदा व्यत्यय आणला, पण अखेर राखीव दिवशी न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व ठेवत ८ विकेट्सने विजय मिळवत कसोटीतील पहिला किंग होण्याचा मान मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC स्पर्धेत या ५ फलंदाजांच्या बॅटमधून निघाल्या सर्वाधिक धावा, भारताच्या रहाणेचाही समावेश
आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारे ६ भारतीय कर्णधार; विराटच्या नावावर आहे ‘हे’ एकमेव जेतेपद






