टी20 विश्वचषक 2024 ला लवकरच सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मध्ये खेळला जाईल. आगामी विश्वचषकात सर्वांच्या नजरा सह-यजमान अमेरिकेवर आहे. यूएसएचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांनी बांगलादेशसारख्या प्रस्थापित संघाला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
आगामी टी20 विश्वचषकात अमेरिकेचा संघ भारताच्या गटात आहे. या गटात भारत आणि अमेरिकेशिवाय पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे देश आहे. अमेरिकेचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघाला त्यांना हलक्यात घेणं परवडणारं नाही. भारतीय संघाला अमेरिकेकडून कडवी टक्कर मिळू शकते. अमेरिकन संघात काही चांगले खेळाडू आहेत, जे घरच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात. या बातमीद्वारे अशाच 5 अमेरिकन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यापासून रोहित ब्रिगेडला सावध राहावं लागेल.
सौरभ नेत्रावलकर – 32 वर्षीय सौरभ नेत्रावलकर हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. सौरभ नेत्रावलकर 2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांसारख्या स्टार भारतीय खेळाडूंसोबत खेळला आहे. त्यानं 2013 साली मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र, फारशी संधी न मिळाल्यानं सौरभ अमेरिकेकडे वळला. त्यानंतर सौरभनं कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. सौरभ ओरॅकल या सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करतो. नेत्रावळकरनं 2019 मध्ये यूएसएकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नेत्रावलकरनं आतापर्यंत अमेरिकेसाठी 48 एकदिवसीय आणि 26 टी20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 73 आणि टी20 सामन्यांमध्ये 27 बळी घेतले आहेत.
कोरी अँडरसन – एकेकाळी कोरी अँडरसनची गणना न्यूझीलंडच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये व्हायची. मात्र तो आता अमेरिकन संघाकडून खेळत आहे. अँडरसनने गेल्या महिन्यात कॅनडाविरुद्धच्या टी20 सामन्यात यूएसए संघाकडून पदार्पण केलं. एकेकाळी त्याच्या नावे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम होता. अँडरसननं 1 जानेवारी 2014 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 36 चेंडूत शतक झळकावलं होतं. कोरी अँडरसननं न्यूझीलंडकडून 13 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 31 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्यानं कसोटीत 683 धावा, एकदिवसीय सामन्यात 1109 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 485 धावा केल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचे झालं तर, न्यूझीलंडकडून अँडरसननं 90 बळी घेतले आहेत.
हरमीत सिंग – 7 सप्टेंबर 1992 रोजी मुंबईत जन्मलेला हरमीत सिंग हा डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. हरमीतनं अमेरिकेसाठी 6 टी20 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं 81 धावा करण्यासोबतच 6 विकेट्स घेतल्या आहेत. माजी भारतीय फलंदाज दिलीप सरदेसाई यांनी जेव्हा पहिल्यांदा त्याला खेळताना पाहिलं तेव्हा त्यांनी हरमीतची तुलना त्यांच्या समकालीन फिरकीपटू बिशन बेदीशी केली होती. वयाच्या 19 व्या वर्षी हरमीतनं दोन अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. 2012 मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर 19 विश्वचषक जिंकला होता, त्यामध्ये त्यानं संपूर्ण विश्वचषकात खूपच चांगली गोलंदाजी केली होती. हरमीत मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आहे. तसेच तो आयपीएल 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला होता.
अली खान – पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या अली खाननं अमेरिकेसाठी 15 एकदिवसीय आणि 8 टी20 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्यानं एकदिवसीय सामन्यात 33 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 विकेट घेतल्या. 33 वर्षीय अली खाननं 2019 मध्ये पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केलं. अली खान प्रतितास 140 किमी पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करू शकतो. तो अनेकदा स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना दिसतो. तसेच तो उत्कृष्ट यॉर्कर गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
स्टीव्हन टेलर – 30 वर्षीय स्टीव्हन टेलरची गणना यूएसएच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. डाव्या हातानं सलामी फलंदाजी करणारा टेलर हा उजव्या हाताचा उपयुक्त गोलंदाज आहे. टेलरनं अमेरिकेसाठी 45 वनडे आणि 24 टी20 सामने खेळले आहेत. टेलरनं एकदिवसीय सामन्यात 1192 धावा केल्या आहेत. यासोबतच त्यानं 37 विकेट्सही घेतल्या आहेत. तर टी20 इंटरनॅशनलमध्ये टेलरच्या नावावर 742 धावा आणि 11 विकेट आहेत.
2024 टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेचा संघ – मोनांक पटेल (कर्णधार/यष्टीरक्षक), आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली वॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर
राखीव खेळाडू – गजानंद सिंग, जुआनोय ड्रायस्डेल, यासिर मोहम्मद
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक पांड्याच्या संपत्तीचा 70 टक्के हिस्सा घेणार नताशा? मुंबईच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती?
पराभवानंतर आता लाखो रुपयांचा दंड! राजस्थानच्या ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयनं केली कारवाई
दिनेश कार्तिक पाठोपाठ आता ‘गब्बर’ही करणार क्रिकेटला अलविदा? शिखर धवनच्या निवृत्तीबाबत काय आहे अपडेट?