भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या चार सामन्यांटी कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेनंतर १२ मार्चपासून हे दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२१ च्या दृष्टीने संघ निवडकर्त्यांनी खेळाडूंची निवड केली आहे. परंतु यादरम्यान त्यांनी काही अचंबित करणारे निर्णय घेतले आहेत.
भारताच्या या १९ सदस्यीय संघाची कमान विराट कोहलीच्या हाती सोपवण्यात आली आहे. सोबत निवडकर्त्यांनी अशा काही खेळाडूंना संधी दिली आहे, ज्यांची चाहते आणि क्रिकेट तज्ञ फार काळापासून वाट पाहात होते. तर दुसरीकडे काही प्रतिभाशाली खेळाडू, जे स्वतला टी२० क्रिकेट स्वरुपात सिद्ध करू शकले नाही. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. येथे आम्ही भारतीय टी२० संघाच्या निवडीशी संबंधित ५ महत्त्वपुर्ण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
चला तर पाहूया….
– भारतीय टी२० संघात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू दमदार प्रतिभा आणि लक्षणीय प्रदर्शनानंतर टी२० स्वरुपात संधी मिळण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहात होते. जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचे ते प्रमुख खेळाडू आहेत. आय़पीएल २०२० मध्ये मुंबईला विजेतेपद जिंकून देण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले होते.
– याबरोबरच राहुल तेवतिया याच्या निवडीने सर्वांचा आश्चर्यांना धक्का बसला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्त्व करणारा हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही माहीर आहे. गतवर्षी शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात ५ षटकार मारत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच आपल्या लेग स्पिन गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररणाने त्याने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते.
– एकीकडे काही गुणवंत खेळाडूंना टी२० संघात प्रवेश मिळाला आहे, दुसरीकडे काही प्रतिभाशाली खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. भारताचा विस्फोटक फलंदाज संजू सॅमसन याला मागील काळातील खराब प्रदर्शनामुळे संघाबाहेर करण्यात आले आहे. तर मनिष पांडेची टी२० क्रिकेटमध्ये ४४.३१ अशी उल्लेखणीय सरासरी असतानाही त्याची निवड करण्यात आली नाही. गोलंदाजांमध्ये चायनामन कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांनाही बाहेर बसवण्यात आले आहे. सोबतच राहुल चाहरही संघाबाहेर आहे.
– भारतीय टी२० संघाच्या निवडीशी संबंधित चौथी मोठी बाब म्हणजे, खेळाडूंचे पुनरागमन. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी स्वरुपात चमकदार कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतचे टी२० संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झालेल्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला संघात संधी मिळाली आहे. अष्टपैलू अक्षर पटेलचे टी२० स्वरुपात पुनरागमन झाले आहे. तसेच दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमारलाही पुन्हा त्याचे स्थान परत मिळाले आहे.
– याबरोबरच रोटेशन पॉलिसीनुसार आयपीएल २०२० नंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
आखिर वो दिन आ ही गया! सुर्यकुमारची टीम इंडियात निवड झाल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस
एकाच दिवसात इशान किशनचा डबल धमाका! सकाळी झळकवले विक्रमी शतक, तर संध्याकाळी झाली भारतीय संघात निवड