भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याने हा निर्णय जाहीर केला. त्याच्या या राजीनाम्यानंतर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे कर्णधारपदाची सूत्रे दिली जाऊ शकतात. विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात अनेक युवा भारतीय खेळाडूंना संधी दिली. त्यातील काहींनी या संधीचे सोने करत भारतीय संघात आपली जागा मजबूत केली आहे.
आज आपण अशाच पाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी विराटच्या नेतृत्वात भारतीय टी२० संघात पदार्पण केले व आज भारतीय संघाचा ते प्रमुख बनले आहेत.
१) रिषभ पंत-
सन २०१६ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात व आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर दिल्लीचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला सर्वप्रथम विराटने भारतीय संघात स्थान दिले. १ फेब्रुवारी २०१७ रोजी इंग्लंड विरुद्ध वयाच्या केवळ अठराव्या वर्षी रिषभने भारतासाठी पदार्पण केले होते. रिषभने भारतासाठी आत्तापर्यंत २९ टी२० सामने खेळताना ५१२ धावा केल्या आहेत. तसेच, आगामी टी२० विश्वचषकात तो भारतासाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
२) श्रेयस अय्यर-
आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी केल्यानंतर मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याला भारतीय संघात संधी मिळाली. त्याने विराटच्या नेतृत्वात १ नोव्हेंबर २०१७ रोजी टी२० पदार्पण केले. अय्यरने भारतासाठी आत्तापर्यंत २६ टी२० सामने खेळताना ५५० धावा चोपल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व देखील केले असून, पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकात त्याला राखीव भारतीय खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे.
३) शार्दुल ठाकूर-
अय्यर प्रमाणेच मुंबईचा अष्टपैलू असलेल्या शार्दुल ठाकूर यानेदेखील आपल्या आंतराष्ट्रीय टी२० कारकिर्दीचा श्रीगणेशा विराटच्या नेतृत्वात केला होता. सध्या भारताच्या तिन्ही संघात समाविष्ट असलेला शार्दुल आत्तापर्यंत भारतासाठी चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरलाय. आगामी विश्वचषकासाठी राखीव असणाऱ्या तीन खेळाडूंत त्याचा समावेश आहे.
४) दीपक चाहर-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये व आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यात वाकबगार असणाऱ्या दीपक चाहर यानेदेखील २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतासाठी टी२० पदार्पण केलेले. सध्या त्याच्या नावे १४ टी२० सामन्यात २० बळी जमा आहेत. टी२० विश्वचषकासाठीचा तिसरा राखीव खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे.
५) इशान किशन-
भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन याला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिली संधी देण्याचा मान विराटकडे जातो. विराटने चालू वर्षी इंग्लंड विरुद्ध टी२० मालिकेत किशनला पदार्पणाची संधी दिली होती. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेली. त्यानंतर श्रीलंकेत केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर इशानची टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ना मोनालिसा, ना लोलिता, ही तर चहलची ‘परम सुंदरी’; धनश्रीच्या जबरदस्त डान्सने इंटरनेटवर लावली आग
“विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नाही”, माजी निवडसमिती अध्यक्षांनी व्यक्त केला संशय
भारतानंतर पाकिस्तानात बदलाचे वारे, नव्या बोर्ड अध्यक्षाचे बाबरच्या नेतृत्त्वपदाबाबत मोठे विधान