इंडियन प्रीमीयर लीगचा(आयपीएल) १३ वा मोसम २९ मार्चपासून सुरु होणार होता. मात्र सध्या जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा हा मोसम सध्यातरी १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
तसेच कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आयपीएलचा हा मोसम रद्दही होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर काही भारतीय खेळाडूंना कारकिर्दीत मोठे नुकसान होऊ शकते. कारण या आयपीएलनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे ही आयपीएल अनेक दृष्टीने खेळाडूंसाठी महत्त्वाची आहे.
आयपीएलचा १३ मोसम रद्द झाला तर या ५ खेळाडूंचे होऊ शकते नुकसान –
भुवनेश्वर कुमार – 30 वर्षीय भुवनेश्वर कुमार मागील अनेक महिन्यांपासून दुखापतीचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीतून तो आता सावरला आहे. पण त्याला अजून त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही.
त्यामुळे त्याच्यासाठी ही आयपीएल तंदुरुस्ती दाखवण्यासाठी आणि पुनरागमनासाठी चांगली संधी आहे. याद्वारे तो स्वत:ला सिद्ध करुन टी२० विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे निवडकर्त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकतो.
तशी त्याची याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड झाली होती. पण या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उर्वरित २ सामने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता रद्द करण्यात आले.
एमएस धोनी – २०१९ विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज धोनी क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता तो आयपीएल २०२०मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. तसेच आयपीएमार्गे तो भारतीय संघातही पुनरागमन करु शकतो अशी चर्चा होती.
तसेच धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर आयपीएलमधून त्याला त्याचा फॉर्म सिद्ध करावा लागेल असे सांगण्यात आले होते. पण कोरोना व्हायरसमुळे सध्या आयपीएलच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे जर आयपीएल रद्द झाले तर धोनीच्या पुनरागमनालाही काहीप्रमाणात धक्का लागू शकतो.
शिखर धवन- भारताचा सलामीवीर फलंदाज शिखरला मागील वर्षापासून सातत्याने दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. त्याला गेल्या वर्षभरात झालेल्या दुखापतींमुळे अनेक क्रिकेट मालिकांना मुकावे लागले आहे. पण आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला होता. परंतू ही मालिका रद्द झाली. त्यामुळे आता त्याच्याकडे त्याच्या फॉर्म सिद्ध करण्यासाठी आयपीएलचा मार्ग होता.
तसेच भारतीय संघात त्याची जागा घेण्यासाठी अन्य युवा खेळाडू सज्ज आहेत. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय संघात तो अजूनही फिट असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयपीएल एक चांगला पर्याय होता. पण आयपीएलच्या १३ व्या मोसमावर सध्या प्रश्नचिन्ह आहे.
सुरेश रैना – जूलै २०१८पासून रैना भारतीय संघापासून दूर आहे. तसेच तो स्पर्धांत्मक क्रिकेटमध्येही शेवटचा सामना आयपीएल २०१९च्या मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून अंतिम फेरीत खेळला आहे.
त्यानंतर त्याला गुडघ्याची दुखापत झाली. परिणामी त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्याला मागील वर्षभरात क्रिकेटपासून दूर रहावे लागले. पण असे असले तरी ३३ वर्षीय रैनाला भारतीय संघात पुनरागमन करण्याची आपेक्षा आहे. त्यात टी२० विश्वचषक याचवर्षी असल्याने त्याच्यासाठी यावर्षीचा आयपीएल मोसम महत्त्वाचा आहे.
केदार जाधव – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवसाठी भारतीय संघातील स्थान टिकवायचे असेल तर आयपीएलचा हा मोसम महत्त्वाचा आहे. अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे त्यालाही जर टी२० विश्वचषकासाठी स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर आयपीएल महत्त्वाचे आहे.
तसेच तो त्याआधी त्याच्या काही दुखापतींमुळेही क्रिकेटपासून दूर होता. पण त्यानंतर केदारने टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतरही तो खास फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आयपीएल २०२० महत्त्वाचे आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–त्या खेळीने युवराजचे नाव अजरामर तर केलंच पण टीम इंडियाचं टेन्शनही दूर केलं
–भारतीयांसारखं क्रिकेटवर प्रेम जगात कुणीच करत नाही
–आणि ती गोष्ट घडताच मराठमोळ्या प्रविण तांबेला नाही आवरले अश्रु
–मी टीम इंडियाला जिंकवायला आलो आहे, हार्दिकला संघाबाहेर काढायला नाही
–बीसीसीआयची काटकसर सुरु! असे वाचवणार टीम इंडियाचे पैसे