---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 11:16 AM
---Advertisement---

मुंबई। आयपीएल 2020 च्या 7 व्या सामन्यात शुक्रवारी(25 सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 44 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 175 धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्ज केवळ 131 धावा करु शकला. आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा पराभव आहे. धोनीच्या संघाने सलग दोन सामने का गमावले? याची कारणे जाणून घेऊया.

1. या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्जची सलामी जोडी सर्वात कमकुवत बाजू आहे.  शेन वॉटसन आणि मुरली विजयची जोडी अजिबात फॉर्ममध्ये दिसलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून वॉटसन लीग सामन्यांमध्ये खराब कामगिरी करत आहे, तर मुरली विजयसुद्धा बर्‍याच दिवसानंतर आयपीएलमध्ये सलामीला खेळत ​​आहे. तिन्ही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. दिल्लीविरुद्ध वॉटसन 16 चेंडूत 14 धावांवर बाद झाला आणि मुरली विजयने दिल्ली कॅपिटल्सच्या विरूद्ध 15 चेंडूंत 10 धावा केल्या. दोघांचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी होता, याचा परिणाम म्हणून चेन्नईच्या मधल्या फळीवर दबाव निर्माण झाला.

2. वरची फलंदाजी फळी फ्लॉप झाल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या मधल्या फळीवर दबाव आला. तसेच सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत या संघाला मधल्या फळीत बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला आहे.  अंबाती रायुडूसुद्धा शेवटच्या दोन सामन्यांत तंदुरुस्त नव्हता. ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत आहे. त्यातही त्याला खास काही करता आलेले नाही. याशिवाय केदार जाधवदेखील खूप संथ फलंदाजी करत आहे. धोनी स्वत: खूप उशीराने क्रीजवर येत आहे, परिणामी संघाने दोन सामने गमावले आहेत.

3. एमएस धोनीच्या संघातील गोलंदाजही अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसतात. मागीलवर्षी चहरने अनेकदा संघाला पॉवरप्लेमध्ये यश मिळवून दिले होते. पण यावेळी तो अजून चांगल्या फॉर्ममध्ये दिसला नाही. त्याचवेळी यंदा सॅम करन चांगली गोलंदाजी करत आहे, पण फिरकीपटू रवींद्र जडेजाने गेल्या तीन सामन्यात खूप धावा दिल्या आहेत. पीयूष चावलाची कामगिरीही जेमतेम राहिली आहे.  पहिल्या दोन षटकांत तो खूप धावा देतो, त्यामुळे विरोधी संघावर कोणताही दबाव नसतो. दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर धोनीनेही कबूल केले की, त्याचे गोलंदाज योग्य टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करू शकले नाहीत.

4. चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचे कारण म्हणजे एमएस धोनीची कमकुवत रणनीती आहे. शेवटच्या दोन सामन्यांत सामना चेन्नईच्या हातातून निसटला तेव्हा धोनी फलंदाजीला येत आहे.  जेव्हा धोनीने दिल्लीविरुद्ध क्रीजवर आला तेव्हा त्यावेळी फक्त 26 चेंडू शिल्लक होते. रैनाच्या अनुपस्थितीत धोनी चेन्नईचा एकमेव अनुभवी खेळाडू आहे, परंतु असे असूनही तो उशीराने क्रीजवर पाऊल ठेवत आहे. त्याच्या या रणनीतीमुळे सर्व क्रिकेट दिग्गज आश्चर्यचकित आहेत.

5. चेन्नईच्या सलग दोन पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे वरिष्ठ खेळाडू संघातून बाहेर पडणे. हरभजन सिंग आयपीएल खेळत नाही.  रैनानेही स्पर्धेपूर्वी आपले नाव मागे घेतले.  यानंतर रायुडू आणि ड्वेन ब्राव्होदेखील तंदुरुस्त नाहीत. हे चारही खेळाडू चेन्नई संघाकडून चांगले योगदान द्यायचे आणि त्यांची उणीव चेन्नईला स्पष्टपणे जाणवत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---