खेळांच्या दृष्टीने २०२० हे वर्ष अत्यंत निराशाजनक राहिले. जगभरात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे वर्षातील अनेक महिने लॉकडाउनमध्ये गेले. तसेच खेळाडूंनाही त्यांच्या घरांमध्ये बंदिस्त राहावे लागले. त्याचबरोबर बर्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सामनेदेखील पुढे ढकलणे किंवा रद्द करणे भाग पडले. परिस्थितीत काहीसा सुधार झाल्यानंतरही अनेक स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवाव्या लागल्या.
कोरोना लॉकडाउनमुळे जवळपास ४ महिने क्रीडाजगत ठप्प राहिले. या काळात जगभरातील अनेक खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला. आज आपण २०२० मध्ये निवृत्ती घेतलेल्या पाच सुप्रसिद्ध महिला खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) सना मीर
चालू वर्षात निवृत्ती घेणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये पहिले नाव आहे अनुभवी महिला क्रिकेटपटू सना मीर हीचे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सर्वात अनुभवी क्रिकेटपटू असलेल्या सना हिने आपल्या १५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकला. यावर्षी एप्रिलमध्ये तिने निवृत्तीची घोषणा केली. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सनाने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
सना मीरने आपल्या कारकीर्दीत पाकिस्तानकडून २२६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यातील १३७ सामन्यांमध्ये तिने राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. सना मीरने पाकिस्तानकडून १२० वनडे सामन्यांमध्ये १५१ आणि १०६ टी२० सामन्यांत ८० बळी घेतले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये ती तिसऱ्या स्थानी आहे.
२) दीपा मलिक
या यादीतील दुसरे नाव म्हणजे भारताच्या दिव्यांग खेळाडू दीपा मलिक. रिओ पॅरालंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यांना दिला गेला होता. पॅरालंपिक स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक होते. यासह, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला पॅरा अॅथलीट ठरल्या. मात्र, दीपा मलिक यांनी अचानकपणे ११ मे २०२० रोजी अचानकपणे निवृत्तीची घोषणा केली.
३) लॉरा मार्श
इंग्लंडची माजी दिग्गज महिला क्रिकेटपटू लॉरा मार्श हिनेदेखील याच वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंडसाठी ९ कसोटी, १०३ वनडे व ६७ टी२० सामने खेळलेल्या लॉराने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महिला टी२० विश्वचषकानंतर निवृत्ती स्वीकारली. लॉराने २००७ ते २०१९ या काळात तीन वेळा इंग्लंडला विश्वविजेते बनवण्यात हातभार लावला होता.
४) कॅरोलीना वोज्नियाकी
डेन्मार्कची अव्वल टेनिसपटू कॅरोलीना वोज्नियाकी हिने देखील याचवर्षी स्पर्धात्मक टेनिसला अलविदा केला. तिने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी हा निर्णय घेतला. वोज्नियाकी हिच्या कारकिर्दीची अखेर मात्र निराशजनक झाली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वोज्नियाकीने आपल्या कारकीर्दीत ३० डब्ल्यूटीए विजेतेपदे व १ ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम जिंकले होते. २०१० व २०११ अशी सलग दोन वर्ष ती महिला टेनिसपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी होती.
५) मारिया शारापोवा
जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू म्हणून ओळखली जाणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिने देखील याच वर्षी निवृत्तीची घोषणा केली. आपल्या कारकीर्दी दरम्यान नेहमीच चर्चेत राहिलेल्या शारापोवाने २६ फेब्रुवारी रोजी टेनिसला कायमचा रामराम केला. तिने आपल्या कारकीर्दीत तीन ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज
वाढदिवस विशेष: विश्वचषकात भल्याभल्या क्रिकेटर्सला न जमलेला विक्रम करणारी ‘ती’ पहिलीच
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही कृष्णवर्णीय लोकांविषयी…’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा खळबळजनक खुलासा
पुजारा सांभाळून खेळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ गोलंदाज आखतोय खास प्लॅन
भारतीय संघात कोण घेऊ शकतो शमीची जागा, स्मिथने सांगितले नाव