कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष खरं तर सर्वांच्या कायम लक्षात राहणार आहे. क्रिकेटबद्दल विचार केला असता येथे देखील अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंच्या निवृत्तीमुळे प्रेक्षकांसाठी २०२० हे वर्ष विसरणे अवघड जाणार आहे. आपण या लेखात असे टॉप ६ भारतीय खेळाडू बघणार आहोत, ज्यांनी २०२० मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
१. एमएस धोनी
निश्चितच एमएस धोनीने घेतलेली निवृत्ती २०२० मधील क्रिकेट वर्तुळातील सर्वात मोठी बातमी होती. भारताच्या या दिग्गज कर्णधाराने १५ ऑगस्ट रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे निवृत्तीची घोषणा केली होती. धोनी २०२० मधील टी२० विश्वचषक खेळून निवृत्ती जाहीर करेल, अशी सर्वांना खात्री होती. मात्र, कोरोनामुळे विश्वचषक पुढे ढकलण्यात आला व काही दिवसातच धोनीने निवृत्तीची घोषणा केली.
२. सुरेश रैना
एमएस धोनीचा घनिष्ट मित्र समजला जाणारा सुरेश रैना देखील २०२० मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने देखील निवृत्तीची घोषणा केली होती. भारताच्या या स्टार खेळाडूने आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला अनेक क्रिकेट सामने जिंकून दिले आहे. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी रैनाचे निवृत्त होणे अनेक भारतीय क्रिकेट रसिकांसाठी धक्कादायक होते.
३. इरफान पठाण
सन २०२० वर्षात सर्व प्रथम क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय इरफान पठाण याने घेतला होता. भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने वर्षाच्या सुरुवातीला ४ जानेवारी रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. २००७ टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवणारा इरफान पठाण गेली अनेक वर्षे आतंरराष्ट्रीय तसेच आयपीएल सामन्यात देखील खेळलेला नव्हता. इरफान सध्या समलोचक म्हणून काम करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये इरफानने खेळाडू म्हणून आपला सहभाग नोंदवला होता.
४. प्रज्ञान ओझा
भारताचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाने देखील २१ फेब्रुवारी २०२० मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आयपीएल इतिहासात प्रज्ञान एकमेव फिरकी गोलंदाज आहे, ज्याने एका सत्रात सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप जिंकण्याचा मान मिळवला होता.
५. वसीम जाफर
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने ७ मार्चमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या या खेळाडूला आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकेसे यश मिळाले नाही. अखेर वयाची चाळीशी पार केलेल्या जाफरने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
६. सुदीप त्यागी
चेन्नई सुपर किंग्जचा माजी वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने २०२० मध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. त्यागी मागील अनेक वर्षापासून आयपीएल मधील कुठल्याही संघाचा भाग नव्हता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर इरफान सोबत त्याने श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने उडवली टीम इंडियाची खिल्ली; चाहत्यांनी शिकवला चांगला धडा
कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाला खेळायचंय आयपीएल
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व