आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या सुरवातीपासूनच अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. त्यामुळे या खेळाडूंना आयपीएलमधुन बाहेरही पडावे लागले आहे. असाच एक धक्का कोलकाता नाईट रायडर्स संघाला बसला आहे.
त्यांच्या संघातील कमलेश नागरकोटी हा गोलंदाज पायाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णा या गोलंदाजाची निवड झाली आहे.
कमलेश नागरकोटी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात चांगला चमकला होता. या कामगिरीनंतर त्याला कोलकाताने आयपीएल लिलावात ३.२ कोटी देऊन संघात घेतले होते. पण त्याला दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे.
त्याच्याऐवजी संघात निवड झालेल्या कर्नाटकच्या प्रसिद्ध कृष्णाने आजपर्यंत १९ लिस्ट अ सामने खेळले असून यात त्याने २१.२७ च्या सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ३ ट्वेन्टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत.
याआधीही कोलकाता संघाचा प्रमुख गोलंदाज मिशेल स्टार्कनेही दुखापतीमुळेच आयपीएलमधून माघार घेतली आहे आणि आता कमलेश नागरकोटीही संघाबाहेर पडला आहे.
आयपीएल २०१८ मध्ये कोलकाताचे दोन सामने झाले आहेत. यातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला असून दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.