गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी संभाव्य विजेत्या बंगळुरू एफसीने माजी विजेत्या चेन्नईयन एफसीला 1-0 असे हरवून मोसमात विजयाचे खाते उघडले. कर्णधार सुनील छेत्रीने दुसऱ्या सत्रात पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बंगळुरूने तीन सामन्यांत पहिलाच विजय मिळवला असून दोन बरोबरींसह त्यांचे पाच गुण झाले. त्यांनी सहावरून दोन क्रमांक प्रगती करीत चौथे स्थान गाठले. तिसऱ्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि पाचव्या स्थानावरील हैदराबाद एफसी यांचेही प्रत्येकी पाच गुण आहेत. गोलफरकात तिन्ही संघांची एक अशी समान कामगिरी आहे, पण नॉर्थईस्टचे चार, बंगळुरूचे तीन, तर हैदराबादचे दोन गोल आहेत.
चेन्नईयनची अपराजित मालिका संपली. तीन सामन्यांत त्यांचा हा पहिलाच पराभव आहे. एक विजय व एका बरोबरीसह त्यांचे चार गुण आहेत. त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली.
यादरम्यान 55व्या मिनिटाला बंगळुरूला पेनल्टी मिळाली. चेन्नईयनचा बदली मध्यरक्षक एडवीन वन्सपॉल याने बंगळुरूचा मध्यरक्षक क्लेईटन सिल्वाला पाडले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी बंगळुरूला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी कर्णधार छेत्री पुढे सरसावला. त्याने उजवीकडे ताकदवान फटका मारला. चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याने दिशेचा अंदाज बरोबर घेतला, पण झेप टाकण्यास काही सेकंद उशीर झाल्यामुळे चेंडू त्याला हुलकावणी देत नेटमध्ये गेला.
त्यानंतर 18व्या मिनिटाला इस्माईल गोन्साल्वीसच्या पासवर रॅफेल क्रिव्हेलारोने प्रयत्न केला, पण त्याने मारलेला फटका थेट गुरप्रीतकडे गेला.
बंगळुरूला 31व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला होता. त्याने मारलेला चेंडू क्लेईटन सिल्वाकडे गेला. सिल्वाने गोलक्षेत्रात राहुल भेकेसाठी संधी निर्माण केली, पण भेके हेडिंगमध्ये अचूकता राखू शकला नाही.
परंतु 37व्या मिनिटाला उजवीकडे बंगळुरूला थ्रो-इनची संधी मिळाली. सुरेश वांगजाम याच्यामुळे हे शक्य झाले. भेकेने गोलक्षेत्रात चेंडू फेकला. त्यावर सिल्वाने ही चाल पुढे नेत बचाव फळीतील जुआनन याच्यासाठी संधी निर्माण केली. जुआनन याने हेडिंग केले, पण चेन्नईयनचा गोलरक्षक विशाल कैथ याने चेंडू आरामात अडवला.
पूर्वार्धाच्या अंतिम टप्प्यात डिमास डेल्गाडोने आगेकूच केली. तेव्हा सुनील छेत्री हा सुद्धा अंदाज घेत धावत असल्याचे त्याने हेरले, पण डिमासने पास देताना अवास्तव ताकद लावली. त्यामुळे कैथने चेंडू आरामात अडवला.
खाते उघडल्यानंतर बंगळुरूने चांगले प्रयत्न केले. 68व्या मिनिटाला छेत्रीने बदली खेळाडू क्रिस्तीयन ओप्सेथच्या साथीत चाल रचत चेंडूवर ताबा मिळवला. त्याने उजवीकडे हरमनज्योत खाब्राला पास दिला, पण खाब्राने क्रॉसबारवरून चेंडू मारला.
दोन मिनिटांनी चेन्नईयनचा बचावपटू दिपक टांग्री याला फिनिशींग करता आले नाही. त्यानंतर मध्य फळीतील लालीयनझुला छांगटेने डावीकडून केलेला प्रयत्न अपयशी ठरला.
एक मिनिट बाकी असताना चेन्नईयनच्या क्रिव्हेलारोने दिलेल्या पासवर स्ट्रायकर जेकब सिल्व्हेस्टर चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही.