फुटबॉलविश्वातील अजरामर नाव लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताच्या मातीवर पाऊल टाकणार आहे, अर्जेंटिनाचा हा दिग्गज खेळाडू 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान भारतात मुक्काम करणार आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांना तो भेट देणार आहे.
मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर एका खास मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात येणार आहे, जिथे मेस्सी विराट कोहली, रोहित शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत मैदानावर उतरेल. या सामन्याचा उद्देश मैत्रीचा उत्सव साजरा करणं आणि दोन खेळजगतातील दिग्गजांना एकत्र आणणं आहे. असा खुलासा मीडीया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
वानखेडे स्टेडियम हे भारतीय क्रिकेटसाठी पवित्र भूमी मानली जाते. 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानावर खेळला गेला होता आणि त्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषक जिकंला होता. अशा ऐतिहासिक ठिकाणी मेस्सीची उपस्थिती ही फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही चाहत्यांसाठी एक खास क्षण ठरणार आहे.
या दौऱ्यात कोलकाता हे दुसरं प्रमुख ठिकाण ठरणार आहे. येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर मेस्सीचा खास सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नामवंत मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर, लिओनेल मेस्सी कोलकात्यामध्ये मुलांसाठी फुटबॉल वर्कशॉप आणि क्लिनिक सुद्धा आयोजित करणार आहेत, जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
तिसरं ठिकाण म्हणजे दिल्ली, जिथे मेस्सी काही खास कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. दिल्लीतील स्थानिक फुटबॉल खेळाडूंना आणि चाहत्यांना यानिमित्ताने मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
लिओनेल मेस्सीने शेवटचं भारत दौरा 2011 मध्ये केला होता, जेव्हा त्याने कोलकाताच्या साल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध एक मैत्रीपूर्ण सामना खेळला होता. आता १४ वर्षांनी, भारत पुन्हा एकदा मेस्सीचे स्वागत करण्यास सज्ज आहे.






