टोकियो येथे झालेली ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक राहिली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्स प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक पुरस्कार व बक्षिसे त्याला दिली जात आहेत. एका दिवसात भारतीय क्रीडाविश्वाचा चेहरा बनलेल्या नीरज चोप्राने आपल्या या कामगिरीसाठी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत खुलासा केला.
ऑलिम्पिकला जाण्यासाठी घेतला हा निर्णय
सध्या केवळ २३ वर्षाचा असलेला नीरज आपल्या लांब केसांसाठी प्रसिद्ध होता. अगदी ऑलिम्पिकला जाण्याआधीही त्याचे मोठे केस होते. मात्र, ऑलिम्पिकमध्ये त्याने हे केस कापले. त्याबाबत बोलताना नीरज म्हणाला, “घाम आणि भाला फेकताना येणाऱ्या अडचणींमुळे मी केस कापण्याचा निर्णय घेतला. मला वाटले की, मोठे केस माझ्या कारकीर्दीत अडचण बनत आहेत. माझ्यासाठी सर्वात आधी खेळ आणि नंतर स्टाईल आहे.”
ऑलिम्पिकमध्येही नीरज पट्टा लावलेला दिसून आलेला. आशियाई स्पर्धेवेळी त्याच्या लांब केसांची चांगली चर्चा झाली होती.
नीरजने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक
जूनियर चॅम्पियन, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलेला नीरज ऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याने आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत हे सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नातच ८७.५८ मीटरचा भाला फेकून त्याने आपले एक पदक निश्चित केले होते. त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडू इथपर्यंत पोहोचू न शकल्याने नीरज सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
नीरजने जिंकलेले हे सुवर्ण पदक भारताने ऍथलेटिक्समध्ये जिंकलेले ऑलिम्पिक इतिहासातील पहिले पदक आहे. तसेच, कोणत्याही खेळाडूने वैयक्तिक प्रकारात जिंकलेले हे केवळ दुसरे सुवर्ण ठरले. त्याच्या पूर्वी केवळ नेमबाज अभिनव बिंद्राने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी सकारात्मक, ‘या’ वर्षी होऊ होऊ शकते सुरुवात
तर ठरलं! ‘या’ क्लबसाठी मेस्सी दाखवणार आपला जलवा, लवकरच होणार अधिकृत घोषणा