कोरोना व्हायरसच्या भारतातील वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या हंगामाला तब्बल ६ महिने उशीर झाला आहे. तरीही क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबद्दलची उत्सुकता तसुभरही कमी झालेली नाही.
याआधी २०१४ ला आयपीएलचे २० सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. या २० सामन्यांमध्ये परदेशी फलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. यूएईमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे बरेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत.
यूएईमध्ये ग्लेन मॅक्सवेलचा धमाका –
यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेलने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना ३ वेळा अर्धशतके केली आहेत. यूएईमध्ये आयपीएल सामन्यांमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रमही मॅक्सवेलच्याच नावावर आहे. त्याने दोन वेळा सर्वोच्च ९५ धावांची खेळी केली होती.
एकदा त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अबुधाबी येथे तर एकदा सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध शारजाह येथे प्रत्येकी ९५ धावांची खेळी केली होती. तसेच त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धही शारजाह येथे खेळताना ८९ धावांची खेळी केली होती.
मॅक्सवेल व्यतिरिक्त ऍरॉन फिंचने सनरायझर्स हैद्राबादकडून दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध दुबईमध्ये नाबाद ८८ धावांची खेळी केली होती. तसेच मुंबई इंडियन्सकडून कायरन पोलार्डने दुबईमध्येच सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध ७८ धावांची खेळी केली होती.
यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांत अर्धशतक करणारा एकमेव भारतीय –
यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये परदेशी फलंदाजांचे वर्चस्व राहिले असले तरी अजिंक्य रहाणे हा आयपीएलमध्ये खेळताना यूएईत अर्धशतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अबुधाबी येथे ७२ धावांची खेळी केली होती.