ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला टी-20 विश्वचषक 2026 च्या संघात स्थान मिळालेले नाही. स्मिथने अलीकडेच बीबीएल (BBL) मध्ये शानदार कामगिरी केली होती. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने जोरदार चर्चा घडवून आणली आहे आणि जर कोणत्याही फलंदाजाला दुखापत झाली, तर स्मिथचे नाव विश्वचषक संघात समाविष्ट केले जाऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनीही तसे विधान केले आहे. तसेच रिकी पाँटिंगनेही स्मिथचे समर्थन केले आहे.
बिग बॅश लीगच्या (BBL) सहा सामन्यांत स्मिथने 167 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 299 धावा केल्या. यात 41 चेंडूंत ठोकलेल्या शतकाचाही समावेश आहे. स्पर्धेत किमान 250 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये, केवळ फिन ॲलनचा स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा जास्त होता आणि फक्त डेव्हिड वॉर्नरची सरासरी त्याच्यापेक्षा अधिक होती. स्मिथमुळेच सिडनी सिक्सर्स संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला. मात्र, फायनलमध्ये सिडनी सिक्सर्सला पर्थ स्कॉर्चर्सकडून पराभव स्वीकारावा लागला.
याच फॉर्ममुळे, विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियातील कोणताही खेळाडू जखमी झाल्यास, संभाव्य बोलावण्या (Call-up) साठी स्मिथचे नाव आघाडीवर आहे. त्याला उपखंडात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. रिकी पाँटिंगने देखील मार्शच्या संघात गरज भासल्यास स्मिथला टॉप ऑर्डरमध्ये सामील करण्याचे समर्थन केले आहे. पाँटिंगने ‘द वेस्टर्न ऑस्ट्रेलियन’शी बोलताना सांगितले की, स्मिथचे आकडे इतर कोणत्याही खेळाडू पेक्षा सरस आहेत, पण ट्रेव्हिस हेड (Travis Head & Mitchell marsh) आणि मिचेल मार्श यांच्यापैकी एकाला सलामीच्या जागेवरून बाहेर करणे कठीण आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने पुढे म्हटले की, स्टीव्हला टी-20 मध्ये सलामीवीर म्हणूनच पाहिले गेले आहे, ज्यामुळे कदाचित गेल्या काही वर्षांत निवडीच्या बाबतीत तो थोडा मागे पडला असावा. पण एखाद्या खेळाडूची दुखापत त्याच्यासाठी संघात जागा बनवू शकते.
स्मिथने फेब्रुवारी 2024 पासून ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 67 टी-20 सामन्यांच्या 55 डावांमध्ये 1,094 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतके निघाली आहेत.






