सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. दरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची सुरूवात विजयाने झाली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 295 धावांनी शानदार विजय मिळवला. ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) पर्थ कसोटीत भारतीय संघाची धुरा सांभाळली. त्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत परतला आणि त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला.
रोहित आतापर्यंत या मालिकेत बॅटने फ्लॉप दिसला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ‘मार्क वॉ’ने (Mark Waugh) तिखट प्रतिक्रिया देत म्हटले की, जर मी निवडकर्ता असतो तर मी रोहित शर्माचे आभार मानले असते आणि बुमराहला कर्णधार बनवले असते.
रोहित शर्माने आतापर्यंत मालिकेतील 3 कसोटी सामन्यांच्या 4 डावात अनुक्रमे 3, 6, 10 आणि 3 धावा केल्या आहेत. रोहितचा खराब फॉर्म पाहून मार्क वॉ म्हणाला की, मी मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या आधारे निर्णय घेतला असता. जर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही धावा केल्या नसत्या तर मी त्याचे आभार मानले असते.
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्मा केवळ 3 धावा करून बाद झाला होता. फॉक्स क्रिकेटवर बोलताना मार्क वॉ म्हणाला, “जर मी आता निवडकर्ता असतो, तर ते पुढच्या डावावर अवलंबून राहिले असते, पण जर त्याने दुसऱ्या डावात धावा केल्या नाहीत आणि आम्ही महत्त्वपूर्ण कसोटीसाठी सिडनीला गेलो, तर मी म्हणेन रोहित तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद, आम्ही जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीसाठी आणत आहोत आणि हा तुमच्या कारकिर्दीचा शेवट आहे.”
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून दिसला होता. न्यूझीलंड मालिकेतही रोहितची बॅट शांत दिसली. 3 सामन्यांच्या 6 डावात रोहितची सर्वोच्च धावसंख्या 52 होती.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील चौथ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 9 गडी गमावून 333 धावांची अवैद्य आघाडी घेतली आहे. नाथन लायन (41) आणि स्काॅट बोलँड (10) नाबाद आहेत. दोघांनी 10व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी रचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मेलबर्न कसोटीत नाथन लायन, स्काॅट बोलँड जोडीने रचला इतिहास! कसोटीत 63 वर्षांनंतर केली अशी कामगिरी
दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे WTC फायनलचं समीकरण बदललं, भारताच्या अपेक्षांना मोठा धक्का!
दक्षिण आफ्रिकेची WTC फायनलमध्ये थाटात एंट्री! रोमहर्षक कसोटीत पाकिस्तानचा पराभव