टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर वादग्रस्त कृत्यामुळे कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट ढवळून निघाले. पेनच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने अनुभवी गोलंदाज पॅट कमिन्सला कर्णधारपद देण्यास पाठिंबा दिला आहे. क्लार्कच्या म्हणण्यानुसार, कमिन्सकडे संघाचे नेतृत्व देण्याची वेळ आली आहे.
क्लार्कने अनुभवी गोलंदाज कमिन्सला कसोटी संघाचा कर्णधार होण्यास पाठिंबा दर्शवला आहे. जर कमिन्सला कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले, तर शेफील्ड शिल्डमध्ये घरच्या संघाचे नेतृत्व न करता, ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून तो मायकेल क्लार्क आणि ग्रेग चॅपेल यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरेल. कमिन्सला कर्णधार बनवण्याबाबत क्लार्कने एका कार्यक्रमात सांगितले की, ”जर हे सर्व ३-४ वर्षांपूर्वी घडले असते तर परिस्थिती वेगळी असती. पण आता ऑस्ट्रेलियन संघात अनेक अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आहेत आणि कमिन्सकडे कर्णधारपद देण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण, हे सर्व अनुभवी खेळाडू त्याच्या मदतीला उभे राहतील. स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये बरेच सामने खेळले आहेत. कमिन्सलाही क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मैदानातील डावपेचांबाबत तो आपल्या खेळाडूंशी ज्या पद्धतीने बोलतो आणि क्षेत्ररक्षण उभारतो, हीच एका चांगल्या संघनायकाची खूण आहे.”
स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्याबाबत क्लार्कनेही प्रश्न उपस्थित केला आहे. या संदर्भात तो म्हणाला की, ”जर त्यांनी स्मिथला कर्णधार किंवा उपकर्णधारपदी नियुक्त केले असते, तर मी तोच प्रश्न विचारला असता, जर तेव्हा तो कर्णधारपदासाठी योग्य नव्हता, तर तो आता अचानक कसा योग्य झाला?”
पेनने कर्णधारपदाचा राजीनामा का दिला?
टीम पेनवर आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह फोटो आणि संदेश पाठवल्याचा आरोप आहे आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टास्मानिया येथे पत्रकार परिषदेत त्याने आपला निर्णय जाहीर केला. मात्र, एक खेळाडू म्हणून तो संघासोबतच राहणार आहे.