---Advertisement---

भारतीय क्रिकेटसाठी दुःखद बातमी, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष काळाच्या पडद्याआड

On: सोमवार, जानेवारी 26, 2026 7:04 AM
---Advertisement---

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे रविवारी (25 जानेवारी 2026) नवी दिल्लीत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारांशी झुंज देत होते.

चार दशकांहून अधिक काळ क्रिकेट प्रशासनात सक्रिय असलेल्या बिंद्रा यांना भारतीय क्रिकेटच्या आधुनिकीकरणाचे आणि आर्थिक बळकटीकरणाचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी जवळपास 30 वर्षे पंजाब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मोहालीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमची उभारणी ही त्यांचीच देणगी असून आज ते स्टेडियम ‘आयएस बिंद्रा स्टेडियम’ या नावाने ओळखले जाते.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर सोमवारी दुपारी नवी दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी कमल बिंद्रा, मुलगा अमर बिंद्रा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

इंद्रजीत बिंद्रा यांनी जगमोहन डालमिया यांच्यासोबत मिळून 1987 आणि 1996 च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय त्यांनी आयसीसीचे मुख्य सल्लागार म्हणूनही काम केले.

आयपीएलच्या स्थापनेत आणि टीव्ही हक्कांद्वारे क्रिकेटमधील महसूल वाढवण्यातही बिंद्रांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर आर्थिकदृष्ट्या नवे बळ मिळाले.

2014 साली त्यांनी क्रिकेट प्रशासनातून निवृत्ती स्वीकारली होती. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटने एक दूरदृष्टीचा प्रशासक आणि प्रभावी नेतृत्व गमावले आहे. बीसीसीआयसह संपूर्ण क्रिकेट विश्वातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---