मुंबई । भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आयपीएलची तयारी करण्यासाठी चेन्नईमध्ये पोहोचल्यानंतर शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक व्हिडिओ शेअर करत याची घोषणा केली. मात्र निवृत्तीनंतर धोनी आयपीएल खेळत राहणार आहे. 19 सप्टेंबरपासून यूएई येथे होणार्या आयपीएल स्पर्धेसाठी तो चेन्नईमध्ये तयारी करत आहे.
संपूर्ण जगभरातून धोनीला त्याच्या शानदार कारकिर्दीमुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धोनी पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार नाही, याची खंत करोडो क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, धोनी लवकरच मैदानावर खेळताना दिसून येणार आहे.
धोनीने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो आयपीएल खेळत राहणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येईल.
कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये होणारा आयपीएल स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाची धुरा धोनीच्या खांद्यावर तर मुंबई इंडियन्सची कमान रोहित शर्मा सांभाळणार आहे.
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर रोहीत शर्माने ट्विट करून लिहिले की, “भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक. क्रिकेटमध्ये त्याचा खूपच प्रभाव होता. तो असा व्यक्ती होता ज्याच्या जवळ एक व्हिजन होते. संघ बनवण्यात तो माहीर होता. निळ्या जर्सीतील त्याची आठवण सतत येत राहील. मात्र पिवळ्या जर्सीमधून तो आमच्या जवळच राहील.19 तारखेला टॉस वेळी भेटू.”