भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडूंना टी20 विश्वचषकानंतर या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. कोण आहेत ते दोन खेळाडू आणि त्यांनी असा सल्ला का दिला आहे, चला जाणून घेऊया…
‘म्हणून रोहित आणि विराटने घ्यावी निवृत्ती’
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement from T20I Cricket) घेतली पाहिजे. कारण, पुढील वर्षी वनडे विश्वचषक आहे आणि त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
खरं तर, रवी शास्त्री यांनी यावेळी 2007मध्ये पहिल्या वहिल्या टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे उदाहरणही दिले. एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. शास्त्री यांच्यानुसार, भारतीय संघ आताही त्याप्रकारे काही करू शकते.
‘वरिष्ठ खेळाडू टी20 विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती’
शास्त्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “या विश्वचषकानंतर मी भारताचा एक नवीन संघ पाहत आहे. हा संघ अगदी त्याप्रकारचा असेल, जसा 2007मध्ये एमएस धोनीचा संघ होता. यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांसारखे दिग्गज नव्हते. धोनीने युवा खेळाडूंसोबत विश्वचषक जिंकला होता. यावेळीही तसेच होऊ शकते. खेळाडू चांगले खेळत नाहीत, असे काहीही नाही. मात्र, तुम्ही इतर दोन क्रिकेट प्रकारांसाठी तयारी केली पाहिजे. पुढील वर्षी वनडे विश्वचषक आहे आणि या खेळाडूंवर दबाव यावा असे तुम्हाला वाटत नाही.”
दुसरीकडे, शास्त्रींनी टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या भारतीय संघाला आतापर्यंतचा सर्वोत्तम टी20 संघ म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “मागील सहा-सात वर्षांपासून मी या सर्वांचा भाग राहिलो आहे. आधी एक प्रशिक्षक म्हणून आणि आता बाहेरून मी पाहत आहे. माझ्या मते, हा भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम टी20 संघ आहे. सूर्यकुमार यादव चार, हार्दिक पंड्या पाच, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर खेळल्याने खूप फरक पडत आहे. त्यामुळे वरच्या फळीतील खेळाडूंना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळते.”
आता शास्त्रींचा हा सल्ला ऐकून रोहित आणि विराट विश्वचषकानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जयस्वालचा षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर, गोलंदाजही पाहतच राहिला; पठ्ठ्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ
थायलंडला धूळ चारून आशिया चषक उंचावण्यासाठी हरमनप्रीत तयार; म्हणाली, ‘आम्ही तयार, समोर कुणीही असो…’