जेव्हाही एखादा खेळाडू शानदार कामगिरी करतो, तेव्हा त्याच्यावर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जातात. असेच काहीसे सध्या भारतीय संघाचा आणि इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्याबाबत घडत आहे. गिलने सोमवारी (दि. 15 मे) सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023च्या 62व्या सामन्यात खणखणीत शतक झळकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गिलने शतक ठोकल्यानंतर त्याच्यावर दिग्गज फलंदाज विराट कोहली यानेही कौतुकाचा वर्षाव केला.
शुबमनची वादळी खेळी
या सामन्यात गुजरात टायटन्स संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी शुबमन गिल याने सलामीला फलंदाजी करताना 58 चेंडूत 101 धावा केल्या. तसेच, आपले आयपीएल कारकीर्दीतील पहिले-वहिले शतक झळकावले. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 13 चौकारही मारले. त्याने सहकारी साई सुदर्शन याच्यासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 147 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी चक्क 13.4 षटकांमध्ये झाली.
विराटकडून कौतुक
गिलने अशी खेळी करताच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने त्याच्या कौतुकाचे पूल बांधले. विराट म्हणाला की, शुबमन त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीने युवा पिढीसाठी एक रोडमॅप तयार करू शकतो.
विराट कोहली शुबमन गिल याचे कौतुक करताना इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाला की, “एक संभावना असते आणि नंतर एक गिल असतो. पुढे हो आणि पुढच्या पिढीचे नेतत्व कर.”
विराटची ही स्टोरी आता सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहे. (cricketer virat kohli praised shubman gill said go on and lead the next generation)
शुबमन गिल काय म्हणाला?
अहमदाबादमध्ये शतक ठोकल्यानंतर गिल खूपच खुश दिसला. त्यानेही हेदेखील सांगितले की, त्याचे पदार्पण हैदराबादविरुद्ध 2018मध्ये झाले होते. मात्र, त्यावेळी गिल कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळायचा.
सामन्यानंतर गिल म्हणाला की, “माझे आयपीएल पदार्पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाले होते आणि आता मी त्यांच्याविरुद्ध शतक ठोकले. मला हे शतक करून खूप आनंद झाला आहे. हे सर्व चक्र फिरले. मला आशा आहे की, या हंगामात मी आणखी एक शतक करेल.”
विशेष म्हणजे, मागील डावात लखनऊविरुद्ध शतक ठोकण्यात गिल अपयशी ठरला होता. तो 94 धावांवर नाबाद राहिला होता. त्यावेळी त्याने म्हटले होते की, पुढील पाच सामन्यांपैकी एका सामन्यात शतक ठोकेल आणि त्याने हे खरं करून दाखवले. गिलच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरात संघाने फक्त सामनाच जिंकला नाही, तर संघ प्ले-ऑफसाठीदेखील क्वालिफाय झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: आर्चरला भोवले आयपीएल खेळणे, दुखापतीमुळे झाला ऍशेस मधून ‘आऊट’
भुवीला WTC फायनलसाठी संधी द्यावी का? भारतीय दिग्गजाने दिले हे उत्तर