जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर सातत्याने टीका होत आहे. अनेकांनी भारतीय संघासोबतच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला देखील लक्ष केले. या टीकाकारांमध्ये आता भारताचे माजी कर्णधार व माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांची भर पडली आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीला बीसीसीआय जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू तसेच प्रशिक्षक बदलाची मागणी समोर येतेय. भारतीय संघाला मागील दहा वर्षापासून कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. याच मुद्द्यावर वेंगसरकर यांनी बीसीसीआयवर जहरी टीका केली. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“दुर्दैवाने असे म्हणण्याची वेळ आली आहे की, मागील सहा सात वर्षांपासून निवड समितीमध्ये असे लोक दिसले आहेत, ज्यांच्याकडे कोणतेही ध्येय नाही, खेळाची समज नाही. तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. मात्र, तुम्ही या मागील पाच-सहा वर्षाच्या काळात किती मोठे क्रिकेटपटू तयार केले, हे सांगा? आयपीएलमध्ये केवळ करोडो रुपये घेत खेळाडू खेळत असतात. कोट्यावधींचे करार व मीडिया राइट्स मिळवणे हे यश नसते.”
मधल्या काळात शिखर धवन याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर देखील त्यांनी सडकून टीका केली. भविष्याच्या दृष्टीने तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. वेंगसरकर यांनीच निवडसमिती अध्यक्ष असताना विराट कोहली याला भारतीय संघात संधी दिली होती. त्यानंतर त्यांना निवडसमिती अध्यक्षपदावरून काढण्यात आले होते.
(Former Chief Selector Dilip Vengsarkar Slams Selection Committee BCCI And Team Management)
महत्वाच्या बातम्या –
बापरे! बाल्कनीत बसून सामना पाहत होती महिला, फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुढे काय घडलं पाहाच
जागतिक योगा दिवस 2023 । केव्हा आणि कशी झाली योगा दिनाची सुरुवात? जाणून घ्या इतिहास





