भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच भारतीय संघाने या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात शुबमन गिल, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशात परतला आहे. अशात कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकर यांनी रहाणेविषयी भाष्य केले आहे.
विराटच्या अनुपस्थित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी
आगरकर म्हणाले की, “विराटच्या अनुपस्थितीत रहाणेने वरच्या फळीत फलंदाजीला यायला पाहिजे. त्याने महत्त्वपूर्ण अशा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. रहाणेकडे फलंदाजीचा चांगला अनुभव आहे आणि त्याने भारताकडून बऱ्याच धावा केल्या आहेत. सध्या रहाणेला कर्णधार म्हणून सावधगिरीने सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. जर रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला नाही आला, तर मला आश्चर्य वाटेल.”
शुबमन गिलच्या निवडीला समर्थन
तसेच युवा भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ सध्या खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शॉच्या जागी शुबमन गिल ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजीला उतरेल.
याविषयी बोलताना आगरकर म्हणाले की, “गिल हा एक प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू आहे. माझी इच्छा होती की, गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळायला पाहिजे. त्याच्यामध्ये तेवढी क्षमतादेखील आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील पंजाब संघाकडून सलामीला फलंदाजी करताना दमदार प्रदर्शन केले आहे. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयाला माझे पूर्ण समर्थन आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हे’ दोन खेळाडू करणार पदार्पण
“तो काहीही करू शकतो”, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
‘मी काय करू मग? सोडून टाकू सगळं?’, केएल राहुलला दुसऱ्या कसोटीत संधी न दिल्याने मिम्स व्हायरल