भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे आज(१६ ऑगस्ट) निधन झाले आहे. ते 73 वर्षांते होते. त्यांना शुक्रवारी प्रकृती खालावल्याने वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मागील महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या मूत्रपिंडाच्या संसर्गामध्ये वाढ झाली. त्यांना गुरगावच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
चौहान यांनी भारताकडून 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या 16 अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्यांनी 7 वनडे सामने खेळले असून यात 153 धावा केल्या आहेत.
1970 च्या दशकात त्यांची आणि सुनील गावसकरांची एक यशस्वी सलामी जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांनी 10 शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच भागीदारीत 3000 धावा केल्या आहेत. 1979 मध्ये ओव्हल येथे या दोघांनी केलेली भागीदारी संस्मरणीय मानली जाते. या जोडीने 213 धावांची भागीदारी रचली होती.
चेतन यांनी 179 प्रथम श्रेणी सामन्यांत 40.22 च्या सरासरीने 11143 धावा केल्या. ह्यामध्ये त्यांनी 21 शतके आणि 59 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 1981 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
निवृत्तीनंतर काही काळ ते क्रिकेट समालोचक म्हणून काम केले. यासोबतच दिल्ली राज्य क्रिकेट संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते राजकिय क्षेत्राकडेसुद्धा वळाले. ते उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री होते.