भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक स्थरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भारतातील क्रिकेटपटूंव्यतिरिक्त परदेशी खेळाडूंनी धोनीबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसननेही धोनीचे कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर त्याने तो धोनीची पहिली कसोटी विकेट नसल्याचीही आठवण करुन दिली आहे.
पीटरसन म्हणाला, ‘तू माझा चांगला मित्र आहेस, तूझी कारकिर्द शानदार होती. पण तूझ्या कारकिर्दीच्या शेवटी फक्त एक गोष्ट सांगायची आहे, तू मला कधीही बाद केले नव्हते. हे लॉर्ड कसोटीच्या संदर्भात असून तू आणि तूझे चाहते मला म्हणतात की मी तूझी पहिली कसोटी विकेट आहे, पण तूला माहित आणि मलाही माहित आहे, असे कधीही झाले नाही, ओके? आता ठिक आहे, फक्त मला स्पष्ट करायचे होते की असे कधीही झाले नाही.’
पुढे पीटरसन म्हणाला, ‘तूझ्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन आणि तूझे निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये स्वागत आहे.’
https://twitter.com/KP24/status/1294942158999490568
लॉर्ड्स कसोटीत काय झाले होते –
२०११ ला भारताने इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात धोनीने काहीवेळासाठी राहुल द्रविडकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आणि तो गोलंदाजी करण्यासाठी उतरला. यावेळी एकदा धोनीने पीटरसन झेलबाद झाल्याचे अपील केल्यावर पंचांनी पीटरसनला बाद दिले होते. परंतू पीटरसनने रिव्ह्यूची मागणी केली आणि त्यात चेंडू बॅटला लागला नसल्याचे दिसत होते. त्यामुळे पीटरसनला जीवदान मिळाले आणि धोनीला त्याची पहिली कसोटी विकेट मिळता मिळाता राहिली. त्या सामन्यात नंतर पीटरसनने नाबाद २०२ धावांची खेळी केली होती.
धोनीने त्याच्या आंतररष्ट्रीय कारकिर्दीत एकच विकेट घेतली आहे, ती त्याने वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध घेतली होती.
पीटरसनची झाली फजिती –
धोनीने जरी पीटरसनची विकेट घेतली नसली तरी धोनी त्याला तू माझी पहिली कसोटी विकेट आहेस, असे म्हणतो. ही घटना २०१७ च्या आयपीएल दरम्यानच्या संदर्भातील आहे. झाले असे की रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल पर्व १० मधील दुसरा सामना पुण्यात झाला. या सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करताना पुण्याचा मनोज तिवारी माइकद्वारे इंग्रजी समालोचक पीटरसनशी बोलत होता. यावेळी पीटरसनने धोनीची चेष्टा करण्याचे ठरवले.
पीटरसन तिवारीला बोलला “धोनीला सांग मी (पीटरसन)त्याच्या (धोनी)पेक्षा चांगला गोल्फ खेळाडू आहे ” हे तिवारीने धोनीला सांगितल्यावर धोनीने आपला हजरजबाबीपणा दाखवत उत्तर दिले “तरी माझी पाहिली कसोटी विकेट हा तूच (पीटरसनच)होता” हे उत्तर ऐकल्या नंतर समालोचक कक्षामध्ये एकच हास्य उडाले . पीटरसनची फजिती झाली पण धोनीने आपला हजरजबाबीपणा दाखवून दिला होता.
https://twitter.com/TheSanghiThanos/status/1294920264812126208
या घटनेनंतर पीटरसनला धोनीचे चाहते नेहमी यावरुन ट्रोल करत असतात. त्याचमुळे आज धोनीच्या नेतृत्वाचे औचित्य साधून पीटरसनने सर्वांचा गैरसमज दूर केला की तो धोनीची पहिली कसोटी विकेट नाही.