सध्या जगातील अनेक देश कोरोना व्हायरस या संकटाशी दोन हात करत आहेत. या परिस्थितीत अनेक खेळाडूंनाही घरात बसावे लागले आहे. पण असे असतानाही एक असा क्रिकेटपटू आहे जो सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून येत आहे. तो क्रिकेटपटू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डॅनिएल हॅरिस, जो एक डॉक्टर आहे.
४० वर्षीय डॅनिएलला कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्याने साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर तो बीगबॅश लीग, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्येही खेळला आहे. त्याने १९ वर्षांचा असताना १९९९ ला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
त्याने त्याच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणीचे ५८ सामने खेळले आहेत. यात त्याने ३१.११ च्या सरासरीने ३३२९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ५ शतकांचा आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्याने १३ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या ४९ सामन्यात त्याने ९ अर्धशतकांसह ११९५ धावा केल्या आहेत.
ट्वेंटी२० प्रकारात डॅनिएलने ७८ सामने खेळले असून यामध्ये १ शतक आणि ९ अर्धशतकांसह २९.७७ च्या सरासरीने १९६५ धावा केल्या आहेत. ट्वेंटी२०मधील त्याचे एकमेव शतक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध आले आहे. हे शतक त्याने २०११ च्या चॅम्पियन्स लीगमध्ये साऊथ ऑस्ट्रेलियाकडून खेळताना केले होते. त्यावेळी त्याने १७ चौकार आणि २ षटकारांसह ६१ चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या होत्या. पण तरीही त्या सामन्यात साऊथ ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
परंतु डॅनिएलच्या या खेळीमुळे त्याला २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने त्यावेळी ४ सामने आयपीएलमध्ये खेळताना १११ धावा केल्या होत्या. तसेच हॅरिसने बीग बॅश लीगमध्येही सलग ५ मोसमात १४० पेक्षाही अधिकच्या स्ट्राईकरेटने फलंदाजी केली आहे.
पण २०१४ नंतर तो व्यावसायिक क्रिकेट खेळलेला नाही. त्यानंतर त्याने पुर्णवेळ वैद्यकीय क्षेत्रासाठी दिला. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवत असतानात वैद्यकीय शिक्षण घेतले होते. तो आपत्कालीन चिकित्सक असून तो सध्या साऊथ ऑस्ट्रेलियातील रॉयल ऍडलेड हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची सेवा करत आहे.
याबद्दल काहीदिवसांपूर्वी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की ‘लोकांना मदत करताना छान वाटते. आम्ही रॉयल ऍडलेड हॉस्पिटलमध्ये अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केले. आम्ही आमचे काम करण्याचे मार्ग बदलले आहेत, जेणेकरुन आमचे कर्मचारीही सुरक्षित राहू शकतील.’
ट्रेंडिंग घडामोडी –
माहीचा बड्डे! कॅप्टन कूल धोनीचा बड्डे पोस्टर झालाय रीलिझ, पहा…
युवा खेळाडूंचे करियर व्हावे म्हणून सुशांत सिंग रजपूत फाऊंडेशन काय केले पहाच
सचिनची विकेट घेणं ‘या’ दोन गोलंदाजांसाठी ठरलं होतं वरदान, थेट टीम इंडियात मिळाली होती जागा