भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली आहे.
आता माजी भारतीय क्रिकेटपटू मदनलाल यांनी पुणे कसोटीतील भारताच्या लाजिरवाण्या पराभवामागचं कारण सांगितलं. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावरील परिस्थितनुसार फलंदाजी करायला हवी होती, असं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी खेळपट्टीवर देखील सवाल उपस्थित केले. पुणे कसोटीबद्दल बोलायचं झाल्यास, भारताच्या टॉप 3 फलंदाजांनी पहिल्या डावात मिळून केवळ 60 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात जेव्हा भारताला 359 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं, तेव्हा त्यांचा एकूण स्कोर 108 धावा होत्या.
1983 विश्वचषक विजेते मदनलाल म्हणाले, “साधारणपणे आपण घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकतो, कारण परिस्थिती आपल्याला अनुकूल असते. खेळपट्टी आपल्या शैलीला अनुसरून असते आणि आपल्याला येथे फलंदाजी करण्याचा सराव असतो. या सर्व कारणांमुळे भारताचं पारडं कायम जड असतं.” मदनलाल यांनी खेळपट्टीबाबत निराशा व्यक्त केली. या पिचवर भारतीय गोलंदाजांना जास्त मदत मिळाली नाही, असं ते म्हणाले.
मदनलाल म्हणाले, “आपण स्वत:च यासाठी (पराभवासाठी) जबाबदार आहोत. अशी खेळपट्टी बनवण्याचा काहीच उपयोग नव्हता. मला माहित नाही की अशी पिच बनवण्यासाठी कोणी सांगितलं होतं. हा टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता की अन्य कोणाचा?” ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे एक मजबूत टीम आहे, ज्यात वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंचं उत्तम मिश्रण आहे. तरीही आपण अशी पिच बनवली आणि आपण स्वत:च तिच्या जाळ्यात अडकलो. चांगल्या विकेटवर आपण निश्चितच हा कसोटी सामना जिंकू शकलो असतो.”
हेही वाचा –
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
WTC पॉइंट टेबलमधील भारताचे वर्चस्व धोक्यात, आता आणखी एक सामना गमावल्यास…
लाजिरवाण्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडवर, वानखेडे कसोटीपूर्वी घेतला हा मोठा निर्णय!