काही दिवसांपूर्वी सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धा भारतात पार पडली आणि कोरोनानंतरची ही पहिली देशांतर्गत स्पर्धा यशस्वी झाली. आता येत्या २० फेब्रुवारीपासून भारतात विजय हजारे ट्रॉफी ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. त्याआधी मुंबईने आपल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नव्या प्रभारी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
अनेक दिवस यासाठी चर्चेत असलेले नाव म्हणजे रमेश पोवार. अखेर त्यांचीच मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रभारी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे ते आता विजय हजारे स्पर्धेत मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहेत.
याअगोदर अमित पगनिस हे प्रशिक्षकपदी कार्यरत होते, परंतु यंदाच्या सय्यद अली मुश्ताक स्पर्धेत संघाती खराब कामगिरी असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पोवार यांची तुर्तास प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले होते की, भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार ह्यांची प्रशिक्षकाच्या जागी सध्या नियुक्ती करण्याचा विचार चालू असून त्याचसोबतच त्यांचा कार्यकाळ व इतर गोष्टीसुद्धा नंतर जाहीर केल्या जातील.’
क्रिकबज सोबत बातचीत करताना रमेश पोवार यांनी म्हटले की, “माझ्या क्षमतेवर क्रिकेट सुधारणा समिती व एमसीए यांनी विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता संघांमध्ये सकारात्मक वातावरण तयार करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन”.
पोवार याचा कार्यकाळ २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे स्पर्धेच्या एकदिवसीय स्पर्धेपासून सुरू होईल. या स्पर्धेत मुंबई एलिट ग्रुप डी मध्ये आहे, त्या गटातील सामने जयपूरमध्ये खेळवण्यात येणार असून यात मुंबईसह दिल्ली , महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि पुदुच्चेरी या संघांचा समावेश आहे.
बुधवारी (१० फेब्रुवारी )विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघाची निवड होणार आहे. सलील अंकोला यांच्या मते श्रेयस अय्यर निवडीसाठी उपलब्ध असून तो संघाचे नेतृत्व करेल. श्रेयस अय्यर हा सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला नव्हता. त्यावेळी पहिल्या फेरीतच मुंबई संघ पराभवाला सामोरे गेला होता.
पोवार यांनी भारताकडून २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट, रुट, विलियम्सन की स्मिथ, पाहा कोण आहे चौथ्या डावाचा ‘किंग’
सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…