भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध होता. तो जगातील भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने घाम फोडण्याची क्षमता राखायचा. सेहवाग जेव्हाही मैदानावर उतरला आहे, तेव्हा त्याने फलंदाजीतून वादळ आणले आहे. मात्र, भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी त्याच्यासोबत एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे त्याचे पदार्पण एक वर्षासाठी टळले होते. नुकत्याच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पदार्पणाचा किस्सा सांगितला की, कशाप्रकारे विमानतळावर पोहोचून त्याला परतावे लागले होते.
काय म्हणाला सेहवाग?
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने सांगितले की, “ही गोष्ट 1998 सालची आहे, जेव्हा भारतीय संघ कोकाकोला कपसाठी शारजाहमध्ये गेला होता. त्यावेळी माझ्याकडे अचानक संघ व्यवस्थापनाचा फोन आला आणि त्यांनी शारजाहला बोलावले. तडकाफडकी मी तिकीट काढले आणि विमानतळावर पोहोचलोदेखील. चेक इन झाले होते, पण विमानतळावर पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की, परत जावा.”
काय होतं पूर्ण प्रकरण?
सेहवागने पुढे सांगितले की, “शारजाहमध्ये जेव्हा भारतीय संघ कोकाकोला कपसाठी गेला होता, तेव्हा तिथे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. अशात मला फोन आला, पण जोपर्यंत मी विमानात बसणार होतो, तोपर्यंत जे खेळाडू आजारी होते, ते बरे झाले. अशात संघ व्यवस्थापनाने मला थांबण्यास सांगितले.”
मात्र, त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर सेहवागचे भारतीय संघात पदार्पण झाले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने जगातील वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा चोपल्या.
सेहवागची कारकीर्द
सेहवागने भारतीय संघाकडून 1 एप्रिल, 1999 रोजी पाकिस्तानविरुद्ध मोहालीत वनडे पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी 104 कसोटी सामने, 251 वनडे सामने आणि 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. कसोटीत त्याने 49.34च्या सरासरीने 8586 धावा केल्या. यामध्ये 23 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, वनडेत त्याने 35.05च्या सरीसरीने 15 शतके आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने 8273 धावा केल्या. याव्यतिरिक्त टी20त त्याने 394 धावांचे योगदान दिले होते. (former cricketer virender sehwag told how his debut was postponed due to a phone call)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजानेही ओळखली हार्दिक पंड्याची ताकद; म्हणाला, ‘तो जगातील सर्वोत्तम…’
BREAKING: MPLमध्ये 6 संघांवर रेकॉर्डब्रेक बोली! ऋतुराज पुण्याकडे, तर केदार कोल्हापूरकर; लगेच वाचा