भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेला येत्या १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. कारण टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतातच होणार आहे. यामुळे भारतीय संघाला मायदेशात खेळण्याचा फायदा होऊ शकतो. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मण यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपली सलामी जोडी नियुक्त केली आहे.
स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर प्रक्षेपित होणाऱ्या, क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात लक्ष्मण यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कोणत्या २ फलंदाजांना सलामीची भूमिका देण्यात यावी? असे विचारले गेले. यावर ते म्हणाले, “संघ व्यवस्थापकांसाठी हा कठीण निर्णय असणार आहे. कारण आपण पाहत आहोत, शिखर धवन चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने दिल्ली संघासाठी शतक देखील झळकावले. त्यामुळे निर्णय घेणे कठीण असणार आहे. परंतु माझ्या मते रोहित शर्मासोबत केएल राहुलने सलामीची भूमिका पार पाडावी.”
केएल राहुलने २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्यामुळे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, भारतीय संघ व्यवस्थापक कोणत्या खेळाडूला सलामीची भूमिका पार पाडण्याची संधी देईल.
केएल राहुलची कामगिरी
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज केएल राहुल याने २०१६ मध्ये भारतीय टी२० संघात पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघासाठी एकूण ४४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १५४२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २ शतक आणि १२ अर्धशतक झळकावले आहेत. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने एकूण ३५ सामने खेळले आहेत. यात त्याने ४५ च्या सरासरीने १३३२ धावा केल्या आहेत. यात ४ शतक आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.
शिखर धवनची कामगिरी
भारतीय संघाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा डाव्या हाताचा फलंदाज शिखर धवन याने २०११ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या ६३ टी२० सामन्यात १६६९ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ अर्धशतक झळकावले आहे. तसेच २०१० मध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या गब्बरने खेळलेल्या १३९ सामन्यात ५८०८ धावा केल्या आहेत. यात त्याने १७ शतक आणि ३० अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लिपिकाच्या मुलाचा किर्तीमान! अवघ्या २५ चेंडूत झळकावले शतक, संघाची सेमी फायनलमध्ये धडक
मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई घेऊन मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ
नव्या हंगामात ‘थाला’ची सेना उतरणार नव्या अंदाजात, पाहा सीएसकेची नवीकोरी जर्सी