मंगळवारी (दि. 18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, भारतीय संघ आशिया चषक 2023साठी पाकिस्तानला जाणार नाही. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार नसल्याची धमकी दिली होती. आता पाकिस्तानचे माजी घातक गोलंदाज वसीम अक्रम यांनी जय शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना वसीम अक्रम (Wasim Akram) म्हणाले की, “क्रिकेट बोर्डाने खूपच मोठे वक्तव्य केले आहे. भारत हे निश्चित करू शकत नाही की, पाकिस्तान क्रिकेटने कसे खेळले पाहिजे. पाकिस्तानने 10-15 वर्षांनंतर संघांचे यजमानपद भूषवण्यास सुरू केले आहे. मी एक माजी क्रिकेटपटू आहे. मला माहिती नाही की, राजकारणात काय होत आहे, परंतु याबद्दल बोलणे गरजेचे होते.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “जर जय शाह (Jay Shah) यांना काही बोलायचेच होते, तर त्यांनी आधी पीसीबी अध्यक्षांसोबत फोनवर चर्चा करायला पाहिजे होती किंवा आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक बोलावून या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. जेव्हा पूर्ण परिषदेने आशिया चषकासाठी पाकिस्तानला निवडले असताना, तुम्ही असेच म्हणू शकत नाही की, आम्ही पाकिस्तानला जाणार नाही.”
खरं तर, दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव असल्यामुळे क्रिकेट सामन्यांवरही परिणाम होत आहे. भारताने शेवटचे 2008मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर भारतीय संघ कधीच पाकिस्तानात गेला नाही. एसीसीने पाकिस्तानला आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचे अधिकार दिले आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की, आशिया चषक 2018मध्ये भारतीय संघ या स्पर्धेचा अधिकृत यजमान होता. मात्र, राजकीय तणावाच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये घ्यावी लागली होती.
आता आशिया चषक 2023मध्ये भारतीय संघ कशाप्रकारे सहभाग घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ताहिरचे पाकिस्तानसाठी कोणते स्वप्न राहिले अपूर्ण? 43 वर्षांच्या वयात सांगितल्या मनातील भावना
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष